

पुणे: सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून निवृत्त सहायक पोलिस आयुक्तासह तिघांवर सहकारनगर पोलिसांनी विनयभंग आणि कौटुंबिक क्षळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्तासह, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 5 ते 23 जून 2025 दरम्यानच्या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्ताच्या मुलाचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. पीडित महिला देखील उच्चशिक्षित असून, त्यांचा निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताच्या मुलाशी विवाह झाला होता. (Latest Pune News)
मुलगा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याची बाब महिलेपासून लपवून ठेवण्यात आली होती. विवाहानंतर त्यांना मुलं होत नव्हते. मुलं होण्यासाठी सासऱ्याशी संबंध ठेवावेत, असा दबाव सासू आणि पतीने टाकून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला.
23 जून रोजी महिला एकटी घरात असताना सासऱ्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर सासऱ्याने पद आणि ओळखीची भीती दाखविली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेली महिला माहेरी निघून आली.
तिने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सुनेने पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती मिळाल्यानंतर निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा घर बंद करून पसार झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.