पुणे: देशाचे सहकार विद्यापीठ गुजरातला गेले असून, महाराष्ट्रातही या विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. राज्याचे सहकार विद्यापीठ असलेच पाहिजे, असा माझ्या सुरुवातीपासून आग्रह राहिला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला उर्जितावस्थेत आणून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळविण्यासाठी विजयी झालेले सर्व संचालक मंडळ एकत्रितपणे काम करु, असा विश्वास भाजप नेते व सहकार संघाचे विजयी संचालक आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
सहकारी संघावर दरेकर-संजीव कुसाळकर यांच्या सहकार पॅनेलच्या वर्चस्वानंतर सोमवारी (दि.29) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकाराला ताकद दिली असून, नवीन राष्ट्रीय सहकार धोरणही आलेले आहे. तेसुद्धा सहकार संघाला ताकद देतील.
सहकारी संघाची आर्थिक स्थिती नाजूक असून संघाला शिक्षण निधी वाढविणे, कर्मचार्यांच्या पगाराचा प्रलंबित विषय सोडविण्यासह राज्यातील सहकारी चळवळ ताकदीने पुढे कशी येईल, यासाठी आम्ही काम करु. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद व पाठबळ आम्हाला होते. मतदारांनी दाखविलेला विश्वासाला आम्ही तडा जाऊ न देता राज्याच्या सहकार चळवळीसाठी काम करू, असेही दरेकर म्हणाले.
रोहित पवार अजून बच्चा आहे...
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे आमदार रोहित पवार म्हणत असल्याबद्दल विचारले असता दरेकर म्हणाले, अजून रोहित पवार हा बच्चा आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर एवढी मोठी भाकिते करायला पवार यांनी अजून प्रगल्भ व्हावे. राजकीय उन्हापावसात भिजावे व मग बोलावे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेत जाऊन त्यांनी वक्तव्य करणे म्हणजे पोरकटपणाचे आहे.
खडसे प्रकरणात न्यायव्यवस्था सक्षम आहे
एकनाथ खडसे यांनी पोलिस आणि सरकारवर आरोप करून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. महायुती सरकार एवढे घाबरते का? यावर ते म्हणाले, यामध्ये तपास यंत्रणांना काय वाटते हे महत्त्वाचे आहे. एफआयआर होऊन कार्यवाही सुरु आहे. राजकीय नेत्यांनी बोलणे योग्य नाही. न्याय व्यवस्था यंत्रणा सक्षम आहे.