उपाध्यक्षपदी अर्जुनराव बोरुडे, मानद सचिवपदी रामदास मोरे
तीनही पदाधिका-यांची निवड बिनविरोध
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अर्जुनराव बोरुडे (अहिल्यानगर) तर मानद सचिवपदी रामदास मोरे यांचीही बिनविरोध निवड झालेली आहे.
राज्यात शिक्षण-प्रशिक्षणासाठी गेल्या 107 वर्षांपासून राज्य सहकारी संघ कार्यरत आहे. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दरेकर आणि मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजीव कुसाळकर यांच्या पॅनलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते.
नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक ( पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) दुपारी दोन वाजता मुख्यालयात झाली. या बैठकीमध्ये तिन्ही पदांसाठी एकच उमेदवारांचे नाव आले. त्यानुसार पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करीत जल्लोष साजरा केला.
सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर म्हणाले, राज्याच्या सहकार चळवळीने ग्रामीण अर्थकारणाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा गांधींच्या उपस्थितीत राज्य सहकारी संघाची स्थापना झाली आणि १०७ वर्षे या संघास झाली आहेत. या संघाची वैभवशाली परंपरा असून पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यास माझे प्राधान्य राहील. सहकार चळवळ वाढून त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार नेहमीच आग्रही आहेत. मी ज्या ज्या सहकारी संस्थेत काम केले, तेथे सहकार चळवळ आणि संस्था वाढीस प्राधान्य दिले. सहकाराने अनेकांना मोठे केले. पण आज चळवळीची अवस्था वाईट आहे. त्यामुळे शिक्षण-प्रशिक्षणातून सहकारी संघासाठी काहीतरी उत्तम करूयात. त्यासाठी संघाच्या सर्व संचालकांनी आपले योगदान दयावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.