पुणे: विद्यार्थ्यांमधील विशेष गरजा आणि विविध अडचणींचे प्राथमिक स्तरावरच निदान करून त्यांना आवश्यक शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ‘प्रशस्त ॲप २.०’ची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील प्रवेशित १०० टक्के विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग पूर्ण करावे लागणार आहे.
याबाबत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व शिक्षकांनी ‘प्रशस्त २.०’ ॲपवरील १० प्रशिक्षणात्मक व्हिडिओ पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आतापर्यंत केवळ ४.४६ टक्के शिक्षकांनीच हे १० व्हिडिओ पाहिले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षकांसह विशेष शिक्षकांना निर्देश दिले आहेत.
१ सप्टेंबर २०२६पासून प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘प्रशस्त २.०’ ॲपद्वारे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षकांना ॲपचा वापर, स्क्रीनिंगची पद्धत आणि विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती भरण्याबाबत अचूक माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्क्रीनिंग सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःला अद्ययावत करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
१० व्हिडीओ मिळून प्रशिक्षणाचा कालावधी ५५ मिनिटे
‘प्रशस्त २.०’ ॲपवरील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले १० व्हिडीओ पाहणे आवश्यक आहे. एका व्हिडीओचा कालावधी साधारण पाच मिनिटांचा असून सर्व १० व्हिडीओ मिळून ५५ मिनिटांचा प्रशिक्षणात्मक भाग आहे. त्यामुळे शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण करण्यास टाळाटाळ करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
१०० टक्के स्क्रीनिंगचे आव्हान
पुणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याचे स्क्रीनिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि १ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग, अशा पद्धतीने पुढील कार्यवाही होणार आहे. आतापर्यंत प्रशिक्षण व्हिडीओ पाहणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प असल्याने उर्वरित शिक्षकांनी तातडीने प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.