व्हीव्हीपॅट नसेल तर ईव्हीएमही नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या; प्रशांत जगताप यांची मागणी Pudhari
पुणे

Ballot Paper Voting: व्हीव्हीपॅट नसेल तर ईव्हीएमही नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या; प्रशांत जगताप यांची मागणी

महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोग वापरणार नाही व्हीव्हीपॅट मशिन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: व्हीव्हीपॅट मशिन नसतील तर ईव्हीएमही नको, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीची प्रभागरचना राज्य सरकारकडे सादर केली आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी धक्कादायक निर्णय घेत निवडणुकीतील गैरप्रकारांना एक प्रकारे पोषक वातावरण तयार करण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

पुरेसे व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध नाहीत, असे बोगस कारण देत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिन वापरणार नसल्याचे जाहीर केल्याने जगताप यांनी वरील मागणी केली आहे. (Latest Pune News)

जगताप यांनी याबाबत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे. जगताप यांनी दिलेल्या निवेदनानुसार, देशाच्या संसदेने विधानसभा व लोकसभा निवडणूक वगळता इतर कोणत्याही निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिन्स वापरण्याचा कायदा केलेला नाही.

असे असताना जर निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध नसतील, तर ईव्हीएम मशिनचा घाट कशासाठी? हा प्रश्न आहे. याबाबत पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने कठोर भूमिका घेतली असून, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, अशी भूमिका जगताप यांनी मांडली आहे.

2024 साली घेतलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान प्रक्रियेत मोठा घोळ संपूर्ण देशाने अनुभवला आहे. याबाबत हडपसर विधानसभा मतदारसंघासह अनेक मतदारसंघांमध्ये पुन्हा मतमोजणी करण्यासाठी अनेक उमेदवारांनी न्यायालयात मागणी केली होती. या उमेदवारांच्या म्हणण्यात तथ्य आढळल्याने मतमोजणीची प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशिन हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी व निवडणुकीतील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा आहे.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT