इंदापूर : इंदापूरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. पक्षाने गारटकर समर्थकविरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.(Latest Pune News)
बुधवारी (दि. 12) पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत यासंदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचं ऐकलं, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावर आहोत, पक्षाने जर आमच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
आम्ही विधानसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये 75 हजार मते मला मिळाली होती. त्यानंतरच्या काळात अनेक विरोधकांचे वैर पत्करून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवडून आणले. तुम्हाला आमदार केलं नसतं तर तुम्ही राजकारणात मोठे झालाच नसता. अहंकाराने, पैशाने राजकारण करणे योग्य नाही. माझ्या मनात नगराध्यक्षपद मिळविणे नाही तर सामान्य कार्यकर्त्याला उभे करून त्याच्या पाठीमागे जनशक्ती एकवटून इंदापूरचा विकास करायचा आहे, असेही ते म्हणाले.