पुणे

खेळाडू उपाशी अन् ढोल-ताशा पथक तुपाशी ! सणस मैदानावर विनापरवानगी सराव? 

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महापालिकेच्या  कै. बाबूराव सणस क्रीडा मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, या ट्रॅकच्या बाजूने ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिल्याने खेळाडू उपाशी अन्
ढोल-ताशा पथक तुपाशी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे महापालिकेचे कै. बाबूराव सणस मैदान अनेक दिवसांपासून सरावासाठी खेळाडूंना बंद ठेवले होते. त्यानंतर दुरुस्तीच्या कारणास्तव दोन ते तीन महिने बंद होते. फेब्रुवारी 2023 मध्ये नवा सिंथेटिक ट्रॅक टाकल्यानंतर अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. अखेर मान्यवरांच्या हस्ते या ट्रॅकचे उद्घाटन झाल्यानंतर खेळाडूंसाठी ते खुले करण्यात आले.  सणस मैदानाच्या प्रवेशव्दारावर मनपा प्रशासनाने मैदान खेळाडूंसाठी विनामूल्य खुले असल्याची सूचना दिली असली, तरी त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून ढोल-ताशा पथकांचे सराव सुरू झालेले आहेत.
या मैदानाच्या परिसरातील कबड्डीच्या मैदानावर एका पथकाने मांडव टाकून सराव सुरू केला असून, इतर दोन पथकांनी सिंथेटिक ट्रॅकच्या बाजूलाच आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे हे मैदान खेळाडूंसाठी का ढोल-ताशा पथकांसाठी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाच्या वतीने या पथकांना परवानगी दिलेली नाही, असे सांगितले जात असताना कोणाच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू आहे. याबाबत मनपा प्रशासनाने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे.
सणस मैदानावर कोणत्याही ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिलेली नाही. तशा प्रकारची परिस्थिती मैदानावर असेल, तर त्याबाबत त्वरित माहिती घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
                                                       – डॉ. चेतना केरुरे  उपायुक्त,  क्रीडा विभाग पुणे महापालिका
सणस मैदानावर सध्या सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रामध्ये 400 ते 500 खेळाडू सरावासाठी येत असतात. ट्रॅकवर ढोल-ताशा पथकांचा वावर नसला तरी ट्रॅकच्या बाजूने या पथकांचा सराव सुरू असतो. त्यामुळे खेळाडूंना व्यायामासाठी जागा उपलब्ध होत नाही. मनपा प्रशासनाने खेळाडूंच्या अडचणीची दखल घ्यावी.                                                                                – संदीप निकम, प्रशिक्षक
…असा मिळवा मैदानावर प्रवेश
कै. बाबूराव सणस क्रीडा मैदानावर ज्यांची नोंद आहे त्यांनाच प्रवेश दिला जातो. मात्र, त्या ठिकाणी महापालिकेतील असलेला एक कर्मचारी चिरीमिरी घेऊन परवानगी देत असतो. फक्त 'त्या' कर्मचार्‍याला पटवावे. त्याचबरोबर पथकांच्या वादकांनाही संबंधित कर्मचारीच पाठीशी घालत असल्याची चर्चा मैदानावर खेळाडूंमध्ये सुरू होती.
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT