प्रभाग क्रमांक : 11 रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर
भाजपचा बालेकिल्ला म्हणून कोथरूड मतदारसंघाची ओळख असली, तरी या मतदारसंघातील रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागामध्ये (क्र. 11) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या वेळेस या दोन्ही पक्षांतील मातब्बरांना गळाला लावून शत-प्रतिशत कमळ फुलावयचे ध्येय भाजपने ठेवले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींवर या प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व ठरणार असून, भाजपला येथील मतदार साथ देणार का? हे स्पष्ट होणार आहे. या प्रभागात भाजपच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पौड रोड फाट्याचे दशभुजा गणपती ते शिवतीर्थनगरची कमानीपर्यंत तसेच वरील म्हातोबानगर वस्ती भाग या प्रभागाची हद्द आहे. या प्रभागात सहा झोपडपट्ट्यांचा भाग असून, हे या प्रभागाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. केळेवाडी, हनुमाननगर, राउतवाडी, जय भवानीनगर, किष्किंधानगर, राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) या झोपडपट्ट्यांचा या प्रभागात समावेश आहे. त्यामुळे 65 टक्के मतदार झोपडपट्ट्यांतील, तर 35 टक्के मतदार सोसायट्ट्यांतील आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांची मदार ही झोपडपट्टीतील मतदारांवर असणार आहे. या प्रभागाची लोकसंख्या 76204 इतकी आहे.
प्रभागरचना जाहीर झाल्यापासून माजी नगरसेवकांसह इच्छुकांची महापालिका निवडणुकीची तयार सुरू केली आहे. या प्रभागात ‘अ’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘ब’ आणि ‘क’ गट सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जुना प्रभाग क्रमांक अकरामध्ये काँग्रेसचे रामचंद्र कदम आणि वैशाली मराठे, तर राष्ट्रवादी काँगेसचे दीपक मानकर आणि भाजपच्या छाया मारणे निवडून आला होत्या. एकीकडे कोथरूड मतदारसंघाने कायम भाजपला भरुभरून साथ दिली, मात्र, या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:चे अस्तित्व कायम ठेवले आहे. झोपडपट्टी बहुल भाग असलेल्या प्रभागात काँग्रेसचे कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मानकर यांची स्वत:ची वैयक्तिक वोट बँक आहे. या प्रभागात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याचे शल्य कायम दिसते. आता कोथरूडमध्ये खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी असे सर्व दिग्गज आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविण्यासाठी या सर्व नेत्यांनी कंबर कसली असल्याचे चित्र आहे. त्यात रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागात शंभर टक्के यश मिळेल की नाही? याची शाश्वती नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील दिग्गजांचा प्रवेश देऊन कमळ फुलविण्याचे नियोजन भाजपने केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रभागातील महाआघाडीतील काही माननीय भाजपच्या तंबुत दिसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून रामचंद्र कदम आणि वैशाली मराठे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त नयना सोनार, हरिभाऊ सणस, रवींद्र माझीरे, कान्हूभाऊ साळुंखे हे देखील इच्छुक आहेत. तर भाजपकडून माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह खासदार मोहोळ यांचे चुलत बंधू श्रीधर मोहोळ, डॉ. संदीप बुटाला, अभिजित राऊत, नितीन शिंदे, दिनेश माझीरे, अनिता तलाठी, सचिन जोरी यांचीही नावे चर्चेत आहेत.
हा प्रभाग माजी उपमहापौर दीपक मानकर यांचा बालेकिल्ला असून, या निवडणुकीत ते त्यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर यांना रिंगण्यात उतरवणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) हर्षवर्धन मानकरांसह तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच संतोष सुर्वे, दीपाली डोख हे देखील इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (ठाकरे गट) पुरुषोत्तम विटेकर, मयूर पानसरे, जयदीप पडवळ, शिवसेनेकडून (शिंदे गटाकडून) नितीन पवारांचे नाव चर्चेत आहे. मनसेकडून गणेश शिंदे, किरण उभे, सागर भगत, महेंद्र जाधव, साधू धुमाळ, बाळासाहेब शिंदे हे इच्छुक आहेत. आरपीआयकडून(आठवले गट) बाळासाहेब खंकाळ इच्छुक आहेत. बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांतील इच्छुकांची देखील निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू आहे.