मंचर: पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी वीजदर आकारणी ’कृषी इतर’ या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने राज्यातील सुमारे 75 लाख पशुसंवर्धन व्यवसाय करणार्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्य पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तापकीर यांनी दिली.
शिनोली (ता. आंबेगाव) येथील आंबेगाव अॅग्रोचे संस्थापक शफीभाई मोमीन म्हणाले, सरकारच्या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणार्या पशुपालकांना थेट फायदा मिळणार आहे. (Latest Pune News)
पोंदेवाडी येथील पोल्ट्री व्यावसायिक आणि माजी सरपंच अनिल वाळुंज म्हणाले, या निर्णयामुळे पशुपालन व्यवसायास बळकटी मिळणार आहे. कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलर पंप व इतर सोलार संच उभारण्यास सवलत देण्यास मान्यता दिली आहे.
भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात म्हणाले पशुसंवर्धन व्यवसायासाठी शासन निर्णयांमुळे शाश्वत शेतीला चालना मिळेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल आणि शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. यामुळे पशुपालन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे भाजप पूर्व विभाग मंडलप्रमुख आंबेगाव तालुका किरण वाळुंज यांनी सांगितले.
25 हजार मांसल कुक्कुट पक्षी, 50 हजार अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच 45 हजार क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास, 100 दुधाळ जनावरांचे संगोपन, 500 मेंढी-शेळीपालन व 200 वराह या पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी वीजदर आकारणी ’कृषी इतर’ या वर्गवारीनुसार न करता कृषी वर्गवारीप्रमाणे करण्यास मान्यता मिळाल्याने लाखो शेतकर्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.- प्रमोद हिंगे पाटील, संस्थापक ऊर्जा फूड्स व अॅग्रो