पुणे

लोणावळ्यातील वीजपुरवठा विस्कळीत

Laxman Dhenge

लोणावळा : मागील काही आठवड्यांपासून लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात विद्युतपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने गृहिणी व व्यावसायिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात
आली आहे.

महावितरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

या संदर्भातील निवेदन महावितरणच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात विदयुतपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे न केल्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. याशिवाय खंडाळा, गवळीवाडा, बाजार, कार्ला येथील कनिष्ठ अभियंत्यांकडून नागरिकांचे फोनसुध्दा घेतले जात नाहीत. झाडांच्या फांद्या तोडण्यात न आल्याने मागील काही दिवसांत वादळीवारे व पावसामुळे बर्‍याच ठिकाणी फांद्या तुटून विद्युत लाईनवर पडल्यामुळे वीजपुरवठा 4 ते 5 तास खंडीत झाला होता.

वास्तविक संपूर्ण लोणावळा शहरात 2011 साली गोदरेज कंपनीतर्फे भूमिगत केबल टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु, मागील 14 वर्षांत शहराचा 20 ते 25 टक्के भाग सोडल्यास आजही लोणावळा शहर व परिसरात खांबावरूनच वीजपुरवठा सुरू आहे. तब्बल 9 कोटी 40 लाख रुपये खर्च केल्यानंतरही जर या भूमिगत केबल कार्यान्वित झाल्या नसतील तर त्याची जबाबदारी कोणाची?, असा प्रश्न करण्यात आला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT