पुणे

उन्हाचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांनाही; उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यू

Laxman Dhenge

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढत असून, याचा फटका माणसांप्रमाणे,पशु-पक्षी, प्राण्यांनादेखील बसत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे दररोज कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते. त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटकाही पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटासोबतच कंपनीच्या धोरणामुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
पुरंदरच्या ग्रामीण भागातील तापमान यंदा जास्त प्रमाणात वाढले आहे. तापमान 40 अंशांच्या जवळपास गेले आहे. याचा परिणाम मानवी जीवनासह पोल्ट्री व्यवसायावर होऊ लागला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे शिवाय अंडी उत्पादनही घटले आहे. कोंबड्याचे वजन वाढत नाही. त्यामुळे वाल्हे व परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

रोज 10 ते 12 कोंबड्यांचा मृत्यू

मागील वर्षी 1 हजार पक्षांमागे 6 ते 8 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. यावर्षी यामध्ये वाढ होऊन दिवसाकाठी 10 ते 12 कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यावर्षी वातावरणात मोठा बदल झाला असून, दररोज किमान एक हजार पक्ष्यांमागे 10 ते 12 कोंबड्या दररोज मृत्युमुखी पडत असल्याचे व्यावसायिक सत्यवान सूर्यवंशी, विनय पवार यांनी सांगितले.

उष्णतेपासून बचावासाठी विविध उपायोजना

दरम्यान, उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी वाल्हे परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत, उसाचे पाचट तसेच नारळाच्या फांद्या अंथरल्या आहेत. तर पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर, स्प्रिंकलर, पंखे, कुलर आदी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत उन्हाचा कडाका वाढला आहे. अतिउष्णतेने पक्ष्यांचे वजन घटत आहे. कोंबडीच्या पिलांना उष्णतेची झळ सहन होत नसल्याने दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, शेडवर सतत पाणी फवारणी करावी लागते. कोंबड्यावरील वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे. परिणामी, कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. यामधून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक वाढल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

– सत्यवान सूर्यवंशी, पोल्ट्री व्यावसायिक, वाल्हे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT