खेड शिवापूर: पुणे सातारा रस्त्यावरील वेळू तालुका भोर व खेड शिवापूर तालुका हवेली येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतो असून काहीचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाले असल्याचे वास्तव समोर आले आहे. एवढे होऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार रिलायन्स इन्फ्राचा अधिकारी वर्ग कोमातच आहे हे स्पष्ट होत आहे.
पुणे सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर परिसरात वेळू ता. भोर येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ससेवाडी उड्डाणपुलावरून येणारे वाहन अती वेगाने वेळू येथील उड्डाणपुलावर येतात. उड्डाणपुलावर वाहन येताच समोर खड्डे असल्याचे लक्षात येईपर्यंत सदर वाहन खड्ड्यात आपटले जाते, परिणामी रिक्षा व दुचाकींचे तसेच चार चाकी वाहनांचे रोजच अपघात होत आहेत. (Latest Pune News)
दरम्यान शिंदेवाडी हद्दीत रिक्षा व कारची धडक होऊन अहमद रजा कासीम शेख (वय ११) व उबेद रजा शेख (वय ८) या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. त्याचप्रमाणे मंगळावर दि . ८ रोजी सकाळी वेळू उड्डाणपुलावरील खड्ड्यात रिक्षा पलटी झाल्याने एका मुलाचा पाय मोडला आहे . या घटनेला कोणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न नागरिक व संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात बसणारे सुरेश कोंडे हे उपस्थित करीत आहेत.
याबाबत भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे म्हणाले की, रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी ज्या पद्धतीने टोलनाक्यावर नियोजन करीत असतात. त्याच पद्धतीने ते रस्त्यांची कामे का करीत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. पेट्रोलिंग वाले रोज या रस्त्याने जात असतात, मात्र त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याबाबत रिलायन्स इन्फ्राचे अधिकारी राकेश कोळी म्हणाले की, ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, तेथे लगेचच खड्डे बुजविण्यास सांगितले आहे. आजच तेथील खड्डे बुजविण्यात येतील.