पौड: मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुळशी धरण 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. मुळशी धरणातून मुळा नदीत 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यावर्षी सर्वत्र मे महिन्यातच जोरदार पावसाने हजेरी लावली. मुळशी तालुक्यात देखील मागील दोन महिने संततधार पाऊस सुरू आहे. मुळशी तालुक्यात असलेले पाणी साठवण तलाव जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते.
मात्र, 19 टीएमसी साठवणक्षमता असलेले मुळशी धरण ताम्हिणी घाटमाथ्यावर पडत असलेल्या संततधार पावसामुळे यावर्षी रविवारी (दि. 6) 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात धरण भरल्यानंतर मुळशीतून विसर्ग करण्यात येते. यंदा मात्र रविवारी धरण 75 टक्क्यांच्या वर गेल्याने दक्षता म्हणून धरणातून पाणी सोडणे सुरू झाले आहे.
मुळशी धरणातून सुरूवातीला 400 क्युसेक वेगाने पाणी मुळा नदीत सोडण्यात आले होते; मात्र धरण भागात संततधार पाऊस सुरू असल्याने यापुढे धरणात येणारे पाणी मुळा नदीत सोडण्यात येणार आहे.
मुळा नदीत धरणातून सोडण्यात येणारे पाणी तसेच मुळा नदीला मिळणारे वळकी नदी तसेच खापरगंगा आणि इतर छोट्या-मोठ्या ओढ्याच्या पाण्यामुळे नदी काठी पूर परिस्थिती उद्भवू शकते. यासाठी नियोजन करून मुळशी धरणातून आताच पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे मुळा नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.