चाकण : सध्या रब्बी हंगामातील बटाट्याची काढणी सुरू आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलोला सरासरी 20 रुपये ते 30 रुपये बाजारभाव होता. यंदा बटाट्याला प्रतिकिलो 14 ते 15 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च भागविणे अवघड झाल्याचे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.(Latest Pune News)
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये नवीन गावरान ज्योती बटाट्याची आवक सुरू झाली आहे. या बटाट्याला बाजारात मोठी मागणी आहे. चाकण मार्केटमध्ये या बटाट्याला 15 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. बटाटा सुपर ज्योती वाणाची खेडच्या पश्चिम डोंगराळ भागातील पाईट, कोये, साबुर्डी, औदर, औंढे, सुपे, अनावळे, सायगाव, वेताळे आदी भागांतून आवक होत आहे.
गावरान बटाटा शेती पश्चिम आदिवासी भागात संपूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरतो. बटाटा हे मुख्य नगदी पीक असून, 1 एकरापासून ते 10 एकरांपर्यंतच्या क्षेत्रात लागवड करणारे अनेक शेतकरी सध्या पीक काढणीत व्यग््रा आहेत. घाऊक बाजरात सध्या भाव नाही. परंतु, शेतकऱ्यांना विक्रीशिवाय पर्याय नाही. कारण, या भागात शीतगृहासारखी साठवणव्यवस्था नाही.