नानगाव: कानगाव (ता. दौंड) हे गाव राजकीय पटलावरील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपद हे महिलेसाठी राखीव असल्याने पुरुष मंडळींनी आपल्या घरातील महिला सरपंच व्हावी, यासाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पाहण्यासारखी होणार असल्याचे मतदारांचे मत आहे.
मागील वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या गटाकडे बहुमत आहे, तर सरपंच देखील आमदार राहुल कुल गटाचेच आहेत. गावात आमदार राहुल कुल गट व माजी आमदार रमेश थोरात गट हे दोन्ही गट आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळी परिस्थिती पाहवयास मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Latest Pune News)
सरपंचपद आपल्याकडेच असावे, असे अनेकांना वाटते. परंतु, जेव्हा या पदासाठी अनेकजण इच्छुक असतात, तेव्हा मात्र हा राजकीय पेच सोडविणे कठीण बनते आणि यामुळे निवडणुकीत खर्या अर्थाने रुसवे-फुगवे पाहवयास मिळतात. परिणामी सुरू होते पाडापाडीचे राजकारण. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची देखील योग्य ती दखल घेणे नेत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सरपंचपद हे महिलांसाठी राखीव असल्याने ज्यांना आपल्या घरातील महिला सरपंच व्हावी असे वाटत आहे, त्यामुळे इच्छुक पतीराज, पुरुष मंडळींनी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पतीराजांची व घरातील पुरुष मंडळींची चांगलीच धावपळ पाहवयास मिळणार असून, ही धावपळ आत्तापासूनच सुरू झाली आहे.
...तर वेगळे चित्र पाहवयास मिळेल
गावात सरपंचपद हे किती महत्त्वाचे असते, हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे हे पद आपल्याकडे ठेवण्यासाठी दोन्ही गटांकडून ताकद लावून प्रयत्न करण्यात येतात. तसाच प्रयत्न यंदाच्या निवडणुकीत देखील पाहवयास मिळणार आहे. इच्छुक जास्त असतील आणि त्यांच्यामध्ये योग्य तडजोडी झाल्या नाही, तर निवडणुकीत वेगळे चित्र पाहवयास मिळेल. यांसह यापूर्वीच्या काही घटनांचा देखील यंदाच्या निवडणुकीत प्रभाव पाहवयास मिळणार असल्याची चर्चा आहे.