पुणे

भाजपच्या कामगिरीचे ‘पोस्टमार्टम’; कोअर कमिटी पाठवणार कामाचा अहवाल

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर भाजपने लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीचे आता पोस्टमार्टम होणार आहे. या निवडणुकीत बूथ कमिटीपासून लोकप्रतिनिधीपर्यंत प्रत्येकाने दिलेली जबाबदारी पाळली का आणि प्रत्यक्षात किती काम केले, याचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे ज्या भागात प्रत्यक्षात काम झालेले नाही अशा ठिकाणी आगामी काळात मोठे बदलही होण्याचे संकेत दिले जात आहेत.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 14)  मतदान झाले. भाजपसाठी अतिशय सोपी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्यात अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पक्षाचे मजबूत संघटन असतानाही भाजपची या निवडणुकीत दमछाक झाल्याचे चित्र आहे.
आता या निवडणुकीतील संघटनेचा अहवाल पक्षनेतृत्वाकडे पाठविला जाणार आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनेच्या सूचनेनुसार शहर पातळीवर नेमलेली कोअर कमिटी यासंबंधीचा अहवाल तयार करत आहे. या कमिटीची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर असून, त्यात पुणे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक श्रीनाथ भिमाले, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांचा समावेश आहे.  या कोअर कमिटीही गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीच्या कामकाजावर लक्ष ठेवून होती.
त्यानुसार प्रत्यक्षात बूथ लेवलवर प्रत्यक्षात किती टक्के काम झाले, किती टक्के मतदान झाले, पन्नाप्रमुख प्रत्यक्षात किती मतदारांपर्यंत पोहोचले, स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी किती काम केले, मतदारांना मतदानासाठी किती प्रमाणात बाहेर काढले, अशा सर्व बाबींचाही कमिटीने अभ्यास केला असून, त्यानुसार अहवाल प्रदेश पातळीवर पाठविला जाणार आहे. दरम्यान, कोअर कमिटीच्या या अहवालामुळे प्रत्येक भागात कोणी किती काम केले, हे समोर येणार आहे. त्यामुळे काम करण्याचा देखावा करणार्‍यांचा बुरखा फाटू शकणार आहे. त्याचे परिणाम आगामी काळात होऊ शकतात, असे पक्षातील वरिष्ठ पातळीवरील पदाधिकार्‍याने 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आमची पक्षाची संघटना मतदारांना बाहेर काढण्यात यशस्वी झाली. त्यामुळे मतांचा टक्काही वाढला असल्याचे दिसून येत आहे. आम्ही आमच्या संघटनेच्या कामावर समाधानी आहोत. त्यासंबंधीचा अहवाल कोअर कमिटीच्या माध्यमातून प्रदेश भाजपला पाठविणार आहोत.
   – श्रीनाथ भिमाले, पुणे लोकसभा समन्वयक.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT