Vidyanand Bapat Video DJ LED Pudhari
पुणे

Vidyanand Bapat: ‘पोरं नाही ऐकणार’ म्हणत विद्यानंद बापटांचा LED फोटो लावून DJ अन् ढोल-ताशांचा गजर, व्हिडिओ होतोय व्हायरल

Vidyanand Bapat DJ Controversy: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि डीजेविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट पुन्हा चर्चेत आले आहेत.

Rahul Shelke

Vidyanand Bapat DJ Controversy: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले विद्यानंद बापट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यावेळी मात्र त्यांच्या भूमिकेवरून नव्हे, तर त्यांचा फोटो वापरून करण्यात आलेल्या डीजे कार्यक्रमामुळे हा प्रकार चर्चेत आला आहे.

दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात विद्यानंद बापट यांचा LED स्क्रीनवर फोटो लावण्यात आला आहे. तसेच ढोल-ताशांचाही गजर करण्यात आला आहे. ‘पोरं नाही ऐकणार’ असा उल्लेख LED स्क्रीनवर करण्यात आला आहे, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात चांगलाच चर्चेत आहे. विद्यानंद बापट यांनी या विषयावर सातत्याने भूमिका मांडत उत्सवाच्या काळात डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

बैठकीत बापटांच्या भूमिकेला विरोध

पुणे महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नागरिकांना गणेशोत्सवासंदर्भात काही मुद्दे मांडायचे असल्यास ते मांडण्याची संधी देण्यात आली.

यावेळी विद्यानंद बापट यांनी उभे राहून डीजेच्या वापरावर आक्षेप घेतला आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर बैठकीतील वातावरण काही काळ तापले. काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत बापट यांना सभागृहाबाहेर नेले.

बापटांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार

यानंतर टिळक रोड परिसरात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना विद्यानंद बापट यांच्यासोबत आणखी एक प्रकार घडला. ते ध्वनीप्रदूषण आणि डीजेविरोधातील आपली भूमिका मांडत असताना एक व्यक्ती अचानक त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बापट यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या घटनेमुळेही बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेची जोरदार चर्चा झाली होती.

आता LED फोटो आणि DJचा व्हिडिओ चर्चेत

दरम्यान, आता दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. व्हिडिओमध्ये विद्यानंद बापट यांचा LED स्क्रीनवर फोटो दिसत असून, ढोल-ताशांचा गजर सुरू असल्याचे दिसते.

‘पोरं नाही ऐकणार’ या वाक्याचा संदर्भ देत बापटांच्या भूमिकेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एकीकडे गणेशोत्सव आणि इतर सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनीमर्यादा पाळण्याचा मुद्दा उपस्थित केला जात असताना, दुसरीकडे डीजे आणि ढोल-ताशांच्या वापरावरून सुरू असलेला वाद आता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT