पुणे : पुणे पोलिसांकडून शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केबल टाकण्यासाठी करण्यात येत असलेले रस्ते खोदाईचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कमीत कमी एक मीटरची खोदाई करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र सहा ते बारा इंचाची खोदाई करून केबल टाकण्याचे उद्योग खासगी ठेकेदारांमार्फत सुरू आहेत. अशा पद्धतीच्या निकृष्ट कामामुळे भविष्यात या कामाचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढणार आहे.(Latest Pune News)
शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुणे पोलिसांना गृह विभागाने निधी मंजूर केला आहे. त्या माध्यमातून 2 हजार 886 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल साडेपाचशे कि.मी.ची रस्ते खोदाई करण्यात येणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्यात 75 कि.मी. खोदाईला परवानगी दिली आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून परवानगी नसलेल्या ठिकाणी खोदाईचा आणि थेट पावसाळी लाईनमधून केबल टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी महापालिकेने संबंधित ठेकेदाराच्या या कामांची थेट पोलिसांकडे तक्रारही केली होती.
मात्र, त्यानंतर या खासगी ठेकेदाराकडून कामात सुधारणा झाली नसल्याचे समोर आले आहे. सद्यःस्थितीला शहराच्या अनेक भागात रस्ते खोदाई सुरू आहे. मात्र, ही खोदाई करताना निविदात ठरवून दिलेल्या अटी-शर्तीचे पालन करताच कामे केली जात असल्याचे पुढारीने पाहणीत समोर आले आहे. केबल डक्ट टाकण्यासाठी किमान एक मीटरची खोदाई आवश्यक आहे. मात्र, ठेकेदाराकडून सहा ते बारा मीटर खोदाई करून वरच्या वरच डक्ट अनेक ठिकाणी टाकले जात आहेत. त्यामुळे अशा कामांमुळे निकृष्ट कामामुळे डक्ट लवकर खराब होऊन यंत्रणेत वारंवार व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कामाच्या देखभालीची जबाबदारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनल) या कंपनीकडे आहे. खोदाईच्या निकृष्ट कामाबाबत विभागीय अभियंता किरण जावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही खोदाईच्या कामात गुणव्वता नसल्याचे आमच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, काम व्यवस्थित झाले नाही तर ते आम्ही स्वीकारणार नाही, असे जावळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण कामावर आम्हाला एकाच वेळी देखरेख करणे अशक्य होत असल्याचे सांगत त्यांनी हतबलता व्यक्त केली. दरम्यान या कामात ज्या डक्ट टाकल्या जात आहेत, त्यांच्याही गुणवत्तेनुसार टाकल्या जात आहेत का आणि त्यांची बीएसएनएलच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून होत असलेले हे काम पुणे पोलिसांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. निविदांमधील अटी-शर्तीनुसार काम होत आहे की नाही, हे तपासल्यास या कामांमधील सतत्या समोर येईल.
सीसीटीव्हीसाठी रस्त्यांची खोदाई करताना पदपथ, तसेच दुभाजकांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महापालिकेला पुन्हा खर्च करावा लागणार आहे. तसेच जागा मिळेल तशी खोदाई केली जात असल्याचे चित्र आहे.