मंचर : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील अष्टविनायक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. महामार्गाला काठापूर-पोंदेवाडी रस्ता छेदून जातो. पोंदेवाडी फाटा चौकात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत तीन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या चौकातील रस्तारुंदीकरण करून चौकात विस्तारीकरण केल्यास अपघात टळण्यास मदत होईल, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज आणि काठापूरचे सरपंच अशोक करंडे यांनी केली.(Latest Pune News)
काठापूर बुद्रुक गावातून अष्टविनायक महामार्ग गेला आहे. महामार्गाच्या निर्मितीनंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली. शुक्रवारी (दि. 26) पोंदेवाडी फाटा चौकात अपघात होऊन एका दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. या आधीही या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे अष्टविनायक महामार्गाला काठापूर बुद्रुक गावच्या हद्दीत काठापूर-पोंदेवाडी रस्त्याला छेदून जातो. पोंदेवाडी फाटा हनुमान चौकाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. शिरूर बाजूकडून येणाऱ्या गाड्या पोंदेवाडी मंचरच्या बाजूला वळत असताना अतिशय कमी जागा या ठिकाणी आहे.
त्यामुळे अनेकवेळा वाहनचालकांना गाडी पाठीमागे घेऊन हे वळण घ्यावे लागते. त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या महामार्गावर असणाऱ्या चौकाचे विस्तारीकरण करून येथील 100 मीटर अंतराचे रस्त्याचे रुंदीकरण करून या ठिकाणी अपघात कमी होतील, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी काठापूरचे माजी उपसरपंच विशाल करंडे व पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.