पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाने विक्रमी भाव गाठत नवा इतिहास रचला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावचे शेतकरी सचिन आबाजी देवकर यांच्या शेतातील भगवा डाळिंबाला प्रतिकिलो ६०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला.
विशेष म्हणजे एका डाळिंबाचे वजन तब्बल ८०० ग्रॅम होते. देवकर यांच्या शेतातून सुमारे ४०० किलो डाळिंब विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दाखल झाले. त्यापैकी ३६ किलो डाळिंबाला ६०० रुपये इतका भाव मिळाला.
विक्रमी दर मिळाल्यानंतर शेतकरी सचिन देवकर म्हणाले की, सहा एकर शेतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेत आहोत. सेंद्रिय खतांचा वापर करण्यास प्राधान्य दिल्याने दर्जेदार उत्पादन हाती आले आहे.
त्यामध्ये, मिळालेल्या विक्रमी भावामुळे आमच्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे देवकर यांनी नमूद केले.