पुणे: राज्यातील डाळिंबाचा हंगाम सुरू झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंबाची आवक वाढू लागली आहे. मात्र, नव्या हंगामातील डाळिंबाचे दाणे अद्याप भरले नसून प्रतवारीअभावी त्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे.
परिणामी, डाळिंबाच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले. याखेरीज, उन्हाच्या चटक्याने गळतीचे प्रमाण वाढल्याने बाजारात चिकूची आवक वाढली आहे. त्यातुलनेत मागणी नसल्याने त्याच्या दरही दहा टक्क्यांनी उतरल्याचे सांगण्यात आले.
उन्हाच्या चटक्यामुळे घरगुती ग्राहकांसह शहरातील लिंबू सरबत, रसवंतिगृहे आदी ठिकाणाहून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी पडल्याने लिंबाच्या 15 ते 20 किलोच्या गोणीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे. मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना आणि उन्हाच्या कडाक्यामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे आदी फळांना मागणी टिकून आहे. बाजारातील बहुतांश फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून आहेत.
फळबाजारात रविवारी (दि. 8) मोसंबीची 30 ते 40 टन, संत्रा 20 ते 25 टन, डाळिंब 20 ते 28 टन, पपई 20 ते 40 टेम्पो, लिंबाची सुमारे 2 हजार गोणी, कलिंगड 60 ते 70 गाड्या, खरबूज 60 ते 70 गाड्या, चिक्कू 3 हजार गोणी, पेरु 100 ते 150 क्रेट, अननस 6 ट्रक आणि द्राक्षांची 35 ते 40 टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 1500-2100, मोसंबी : (3 डझन) : 230-350, (4 डझन) : 100-220, संत्रा : (10 किलो) : 400-120, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 70-200, आरक्ता : 10-70, गणेश : 10-40, कलिंगड : 8-28, खरबूज : 12-30, पपई : 10-25, चिक्कू (दहा किलो) : 100-500, पेरु (20 किलो) : 700-800, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (14 किलो) : सुपर सोनाका 800-1400. सोनाका 800-1400, माणिकचमन (15 किलो) 700-900, तास-ए-गणेश 700-900, जम्बो (10 किलो) 1000-11400.