पॉलिटेक्निक प्राध्यापकांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाची संधी! Pudhari
पुणे

MSBTE industrial training 2025: पॉलिटेक्निक प्राध्यापकांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाची संधी!

बीएसएनएलच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण; एमएसबीटीईचा पुढाकार, चार विषयांवर आधारित गट तयार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : ‌‘पॉलिटेक्निक‌’मधील प्राध्यापकांना उद्योग जगताशी प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अर्थात एमएसबीटीईने पुण्यातील ‌‘बीएसएनएल‌’च्या झोनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटरमध्ये औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सत्रासाठीचे वेळापत्रक मंडळाने नुकतेच जाहीर केले असून, यात विविध दूरसंचार विषयांवरील प्रशिक्षणांचा समावेश आहे.(Latest Pune News)

राज्यभरातील शासकीय व अनुदानित संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक इंटर्नशिप आहे. प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव दिला जात आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने आता ‌‘पॉलिटेक्निक‌’मधील प्राध्यापकांना औद्योगिक प्रशिक्षणातून अनेक फायदे देण्याचा विचार केला आहे. प्रगत तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष उपकरणे व नेटवर्क्सच्या साहाय्याने होणार आहे. या प्रशिक्षणातून प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, प्रयोगशाळेबाहेरील व्यवहार्य पद्धती शिकता येतील. त्यामुळे त्यांच्या अध्यापनात व्यवहार्यता वाढून विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या आणि वास्तवाशी निगडित पद्धतीने समजेल. यामुळे अभ्यासक्रम परिपूर्ण शिकवता येईल.

प्राध्यापकांनो, प्रशिक्षणासाठी करा अर्ज

औद्योगिक प्रशिक्षणामुळे प्राध्यापकांमधील कौशल्यवृद्धी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उद्योगाशी जोडलेला हा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठीही उपयुक्त ठरेल. रोजगार बाजारपेठेत आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अंदाज विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टपणे मिळेल. राज्यातील पॉलिटेक्निक संस्थांमधील प्राध्यापकांना संबंधित संस्थेच्या प्राचार्यांच्या शिफारशीसह अर्ज करणे बंधनकारक आहे. संस्थेच्या लेटरहेडवर दिलेल्या तपशिलांनुसार सहभागी प्राध्यापकांचे नाव, संस्था कोड, शाखा, पदनाम, ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

चार प्रशिक्षण गटांचा समावेश

बीएसएनएल झेडटीटीसी पुणे येथे होणाऱ्या प्रशिक्षणांमध्ये एकूण चार गटांचा समावेश करण्यात आला आहे. ‌‘डेटा कम्युनिकेशन‌’ या विषयाचे प्रशिक्षण 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडेल. त्यानंतर ‌‘मोबाईल कम्युनिकेशन‌’ विषयाचे प्रशिक्षण 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होईल. 24 ते 28 नोव्हेंबरदरम्यान ‌‘स्विचिंग व बेसिक टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर‌’ या विषयाचे प्रशिक्षण होणार आहे. शेवटचा गट 8 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान ‌‘ट्रान्समिशन व एफटीटीएच टेक्नॉलॉजी‌’ या विषयावर आधारित असेल. प्रत्येक गटासाठी 30 जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT