प्रदूषणमुक्तीसाठी छोट्या नद्या-नाल्यांवरील पाण्यावर होणार प्रक्रिया; मुरलीधर मोहोळ यांची माहिती File Photo
पुणे

Pune News: प्रदूषणमुक्तीसाठी छोट्या नद्या-नाल्यांवरील पाण्यावर होणार प्रक्रिया; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

प्रमुख नद्या प्रदूषणुक्त करण्यासाठी मोठ्या नद्यांना मिळणार्‍या छोट्या नद्या-नाल्यांवरील पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणुक्त करण्यासाठी मोठ्या नद्यांना मिळणार्‍या छोट्या नद्या-नाल्यांवरील पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली जाईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी मोहोळ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखरसिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते. (Latest Pune News)

जिल्ह्यात सुरू असलेले रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाच्या योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

मोहोळ म्हणाले, औद्योगिक, शैक्षणिक तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात देशात जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्ह्यातील जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गटारातील तसेच औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणीप्रदूषण वाढले आहे.

यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र, फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या,नाले आणि गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे.

’स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेकडून 10 नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मल:निस्सारण तसेच स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे.

मेट्रोच्या विस्ताराला लवकरच गती

रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रो उपयुक्त ठरत आहे. जुलैमध्ये एक लाख 92 हजार, तर ऑगस्ट मध्ये 2 लाख 13 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. सध्या मेट्रोच्या विस्तारीकरणाचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. त्याची तांत्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील कामे सुरू होतील.

आखणीचे काम पूर्ण

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मिनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरू करण्यात आले असून, आखणीचे (मार्किंग) काम पूर्ण झाल्याचेही डुडी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT