मांडवगण फराटा: पूर्वीचे नेते शब्दाला जागणारे होते. त्यामुळे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची गरज भासत नव्हती. मात्र, आजच्या राजकारणात कोणता नेता कोणत्या पक्षात आहे, हेच ओळखणे अवघड झाले आहे. सत्तेसाठी होणाऱ्या तडजोडीच्या या राजकीय ट्रेंडमुळे जनतेचा राजकारणावरील विश्वास दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणूक जाहीर होताच तोच नेता दुसऱ्या पक्षातून उमेदवारी करणार, अशा चर्चांना उधाण येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नेमके काय करावे, फक्त मतदान करून मोकळे व्हावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पक्षांतरामुळे जनतेमध्ये राजकीय व्यवस्थेबाबत नाराजी वाढत चालली आहे.
सत्तेत राहण्याच्या हव्यासापोटी अनेक नेते ’जिकडे सत्ता तिकडे उडी’ मारताना दिसत आहेत. पक्षांची संख्या वाढत चालल्याने राजकारण अधिकच गोंधळात टाकणारे झाले आहे. याचा थेट परिणाम लोकशाहीवर होत आहे. राजकीय अस्थिरता, वारंवार होणारे पक्षांतर आणि सत्ताकेंद्रित निर्णयप्रक्रिया यामुळे लोकशाहीच्या मुळावरच घाव बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आजच्या राजकारणात सत्तेची लालसा सर्वत्र दिसून येत आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी अनेक नेत्यांमध्ये दिसत आहे. यातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात फरक दिसून येत नाही. तसेच विरोधकच शिल्लक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात स्पष्ट भूमिका दिसायच्या. मात्र, आज आघाड्यांची सतत बदलणारी समीकरणे आणि वैचारिक गोंधळ यामुळे विरोधी पक्षांची भूमिका कमकुवत होत चालल्याचे जाणवत आहे.
दरम्यान, ग््राामीण भागातही राजकारणाबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. अनेक तरुण नेतृत्वाची संधी, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने राजकारणात सक्रिय सहभाग घेत आहेत. मात्र, राजकारणात पैसा मिळतो की खर्च करावा लागतो, या प्रश्नामुळे अनेक तरुण संभमात आहेत. काहींना राजकारण हे सेवाभावी कार्य वाटते, तर काहींना ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे भासते. एकूणच, सत्ताकेंद्रित राजकारण, कमकुवत विरोधक आणि नव्या पिढीचा वाढता सहभाग या सर्व घडामोडी भविष्यातील राजकीय दिशेला निर्णायक वळण देणाऱ्या ठरणार.