नारायणगाव : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असल्या, तरी जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभा निवडणूक लढविणार्यांमध्ये आत्ताच स्पर्धा सुरू झाली आहे. जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आशाताई बुचके आणि शरद सोनवणे यांचा पराभव केला होता. बेनके यांचा विजय अगदी काठावर झाला होता. त्यामुळे सोनवणे, बुचके या निवडणुकीत तीव्र इच्छुक असताना आता विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हेही विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने तालुक्यात राजकीय लगबग वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार किंवा अजित पवार असा गट निवडलेला नाही. त्यांचा कल अजित पवार यांच्याकडे आहे. दोन दिवसांपूर्वी विघ्नहर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले होते, त्या वेळी स्वतः आमदार अतुल बेनके त्यांच्यासमवेत उपस्थित होते. भाषणात त्यांनी जुन्नर तालुक्याला शरद पवार यांच्या विचारांची गरज आहे, असे सांगितले. 25 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौर्यावर येत असून, बेनके त्यांच्यासोबतही दिवसभर असणार आहेत.
जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे सध्या एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत. राज्यामध्ये महायुती आहे. ही महायुती लोकसभेनंतर राहो अथवा न राहो, मी विधानसभेची निवडणूक लढविणारच, अशी भीष्मप्रतिज्ञा सोनवणे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे 2024 ची निवडणूक ते लढवणारच आहेत. भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी मागच्या निवडणुकीमध्ये चांगली मते मिळविलेली होती. अपक्ष निवडणूक लढवूनसुद्धा एवढी मते मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. बुचके यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये विकासकामांचा झापाटा लावला असल्यामुळे त्यांची देखील लोकप्रियता सध्या चांगली असल्याचे पाहायला मिळते.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हेसुद्धा 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात असण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडी जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देऊ शकते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सत्यशील शेरकर यांची सध्या जवळीक अधिक वाढली आहे. सध्याची राजकीय गणिते पाहता आमदार अतुल बेनके महायुतीचे उमेदवार झाले, तर आशाताई बुचके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांना आमदार अतुल बेनके यांचा प्रचार करावा लागू शकतो. परंतु, माजी आमदार शरद सोनवणे हे निवडणूक लढविणारच असल्यामुळे व आशाताई बुचके ह्यासुद्धा विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ इच्छुक असल्यामुळे आणि लोकसभा निवडणुकीनंतर महायुती राहणार नसल्याचा दावा आशाताई बुचके यांच्या समर्थकांचा असल्याने आशाताईसुद्धा 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात असणार असल्याचा दावा होतोय.
हेही वाचा