रामदास डोंबे
खोर: गावोगावचा कारभार हा पूर्वी एकोप्याने, परस्परसाहाय्याने आणि गावच्या प्रगतीसाठी चालायचा; मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गावचा कारभार विकासाकडे न जाता राजकीय गटबाजीच्या भोवर्यात अडकून पडला आहे.
निवडणुका संपल्यानंतर गावच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र काम करावे, अशी अपेक्षा असते. पण, वस्तुस्थिती याउलट आहे. ग्रामपंचायत असो वा सहकारी सोसायटी, शाळा समिती असो वा बाजार समिती, आता सर्वत्र गटातटांचे राजकारण डोके वर काढताना दिसते. (Latest Pune News)
विकासाऐवजी खुर्चीचा खेळ
गावात रस्ते डांबरीकरण, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा योजना, शाळांची दुरुस्ती, शेतकर्यांसाठी सिंचन योजना अशा अनेक मूलभूत कामांसाठी शासनाकडून निधी मिळतो. पण हा निधी कसा वापरायचा, कोणत्या गटाने उद्घाटन करायचे, कुठल्या सदस्याचे नाव फलकावर टाकायचे यावरून वाद सुरू होतात. परिणामी कामे रेंगाळतात, निधी परत जातो आणि गाव विकासाविना राहतो. गावकर्यांच्या पैशावर आणि श्रमावर पाणी फिरते.
गाव तुटले... नाती तुटली
गटबाजीमुळे एकाच गावात दोन गट उभे राहिले जात आहेत. नातेवाईक, मित्र, शेजारी यांच्यात वैर निर्माण होते. चौकात बसून सामूहिकपणे निर्णय घेणारे दिवस आता इतिहासजमा झाले. गावाचे एकत्रित सण-उत्सवसुद्धा आता राजकीय रंगात बुडाले आहेत. एकाच गावात दोन गणेशोत्सव, दोन यात्रा, दोन क्रीडा स्पर्धा अशी विभागणी सुरू झाली आहे.
जनतेच्या हिताऐवजी वैयक्तिक स्वार्थ
लोकप्रतिनिधींना लोकसेवेपेक्षा स्वतःची सत्ता टिकवणे आणि गट मजबूत करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. गटपातींच्या दबावामुळे कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही.
विकास योजना कागदावरच अडकतात
गरीब आणि शेतकर्यांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. रोजगार निर्मितीचे प्रयत्न थांबले जाऊन आज तरुणाई हताश व निराश झाली आहे. गावाचा विकास महत्त्वाचा की नेत्यांची गटबाजी..? जनतेला हवा आहे रस्ता, पाणी, रोजगार, शाळा, रुग्णालयेः पण नेत्यांना हव्या आहेत फक्त खुर्च्या, मान-प्रतिष्ठा आणि गटशक्ती. ही आजची सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
बदलाची गरज
गावोगाव गटबाजीमुळे समाज फाटला, विकास अडकला आणि तरुणाईला योग्य दिशा मिळेनाशी झाली आहे. बदल हवा आहे तो विचारसरणीत. ’गावासाठी एकत्र’ हा मंत्र स्वीकारला तरच
खरी प्रगती शक्य आहे; अन्यथा अजून कित्येक वर्षे गावांचा विकास हा फक्त कागदावरच राहणार आहे. त्यामुळेच गावोगाव राजकीय गटबाजी थांबली, तरच गावांचा विकास सुरू होईल हे मात्र त्रिकालबाधीत सत्य आहे.