पोलिसाचा साथीदारांसह धिंगाणा  Pudhari
पुणे

Crime News : मद्यप्राशन करत पोलिसाचा साथीदारांसह खंडोबाचीवाडीत धिंगाणा

या प्रकरणी तिघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Crime News :

बारामती : सातारा जिल्ह्यात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याने साथीदारासह मद्यप्राशन करत बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे धिंगाणा घातला. या प्रकरणी तिघांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी प्रमोद धनसिंग क्षीरसागर, सूरज मारुती आडके व अविनाश पांडूरंग सरगर (सर्व रा. धुळदेव, भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात निखिल पोपट लकडे (रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.

शनिवारी(दि. १० ) मध्यरात्री खंडोबाचीवाडी येथे ही घटना घडली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार फिर्यादीचा भाऊ विक्रांत व आई स्वाती हे घरामध्ये झोपले होते. फिर्यादी हे घराच्या बाहेर ओट्यावर बाजेवर झोपले होते. रात्री फिर्यादीचे पाय कोणी तरी दाबून धरले, त्यामुळे ते झोपेतून उठले. त्यावेळी दुसऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठी मारली. फिर्यादी हे मोठयाने ओरडले असता फिर्यादी भाऊ विक्रांत लकडे व आई स्वाती लकडे हे घराचे बाहेर आले.

फिर्यादीचा पाय दाबुन धरणारा सुरज मारुती आडके हा होता, डोक्यात काठी मारणारा प्रमोद धनसिंग क्षिरसागर हा होता. त्यावेळी फिर्यादीची आई स्वाती लकडे हिस प्रमोद धनसिंग क्षिरसागर व सुरज मारुती आडके यांनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. भाऊ विकांत लकडे यास झाटापटी केली आहे. त्यावेळी विक्रांत लकडे यास प्रमोद क्षिरसागर हा म्हणाला की, मी पोलीस आहे. तुम्हांला इंगा दाखवितो व तुला खल्लास करुन टाकीन अशी धमकी दिली.

अविनाश सरगर यानेही या तिघांना शिविगाळ, दमदाटी केली. फिर्यादीने यावेळी मदतीसाठी उमेश लक्ष्मण लकडे, किरण किसन लकडे, सचिन लक्ष्मण लोखंडे, रणजित किसन लकडे यांना फोन करून बोलावून घेतले. यावेळी विक्रांत यांनी प्रमोद क्षीरसागर यांना तुम्ही घरी का आला, भाऊ व आईला मारहाण का करता असे विचारले. त्यावेळी क्षीरसागर यांनी मी तुझ्या पत्नीचे प्रकरण मिटविण्यासाठी मी आलो आहे, मी तुझ्या पत्नीला पैसे पाठवले नाहीत, तिला फोन केलेले नाहीत. तुझी पत्नी तुझ्याकडे नांदवण्यााठी पाठवायची आहे. यावेळी हे तिघेही दारुचे नशेत होते. ते एमएच-११, बीएच-५४६५ या मोटारीतून आले होते.

फिर्यादीने यावेळी ११२ क्रमांकावर फोन करत पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार करंजेपूल पोलिस चौकीचे कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी या तिघांना ताब्यात घेत करंजेपूल चौकीत नेले तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. फिर्यादी व त्यांच्या आईवर बारामतीतील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT