पुणे: पिंपरी चिंचवडच्या पोलिस उपनिरीक्षकावर पुण्यातील फुरसुंगी पोलिस ठाण्यात विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. अजिंक्य रायसिंग पाटील (वय.३२) असे त्याचे नाव आहे. याबाबत ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांची फिर्यादी महिलेसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्याने फिर्यादीसोबत कपटपूर्व मार्ग अवलंब करुन विवाह करण्याचे वचन दिले. फिर्यादी अगोदरच विवाहित आहे हे पाटील याला माहिती होते. त्याने तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले होते. (Latest Pune News)
पाटील याने फिर्यादीसोबत लग्नाच्या आमिषाने उरळी देवाची व सदाशिव पेठ येथील खोलीत शरीरसंबंध ठेवले. फिर्यादी महिलेने लग्नाचा तगादा लावताच पाटील याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच तुला काय करायच ते कर मला कोणी काही करु शकत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी महिलेने पतीपासून घटस्फोट घेण्याची देखील तयारी केल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी पाटील याने महिलेस लग्नाचा नकार देऊन धमकावल्यानंतर तिने याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पाटील गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना दोघांची ओळख झाली होती.