Police Raid on fake call center
पुणे: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत रोडवर राडे, महिलांवरील अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता हल्ल्यांसारख्या हिंसक घटनांनी पुणे हादरून गेलं आहे. त्यातच आता शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे.
तब्बल दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. त्या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवीले जात असल्याची माहिती आहे. (Latest Pune News)
मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना 'डिजिटल अटक'च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर अनेकांची चौकशी सुरू आहे. तर मुख्य आरोपी हा गुजरातचा असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी शंभर ते दीडशे लोक काम करत असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटाची तपासणी सुरू आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करून पुणे पोलिसांनी सायबर गुन्हेगारीविरुद्ध मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.