पुणे: पुणे महानगरपालिकेने पावसाळी पूर्वकामांना सुरुवात केली आहे. वाहतूक कोंडीच्या दृष्टीने संवेदनशील असणार्या काही ठिकाणी पालिकेला पावसाळी पूर्वकामे करायची होती. यासाठी पालिकेच्या अधिकार्यांनी वाहतूक पोलिसांना कामे करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार ही कामे करण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. 61 ठिकाणी ही कामे केली जाणार असल्याचे पृथ्वीराज म्हणाले.
पुण्यात पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठते. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वर्षी पालिकेने 201 ठिकाणी पाणी साठत असणार्या जागेवर पावसाळी पूर्वीकामे केली जाणार आहेत, याची पाहणी पालिकेने केली असून, कामे करण्यास सुरुवात केली आहे.
या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी जलवाहिन्यादेखील टाकण्यात येणार आहेत. याबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आढावा बैठक घेतली. 201 पैकी 61 ठिकाणांची कामे करण्यास वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांची बैठक झाली. यात पोलिसांनी पालिकेला 61 ठिकाणी पावसाळी पूर्वकामे करण्यास परवानगी दिली आहे.
महापालिका राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनेत 23 ठिकाणी पावसाळी पूर्वकामे करणार आहे. यासाठी 21 कामांसाठी रस्ते खोदाई करावी लागणार असल्याने वाहतूक पोलिसांनी ही कामे करण्यास तत्त्वत: परवानगी दिली आहे. तर 40 ठिकाणी कामेदेखील पालिका करणार आहे. सिंहगड रस्त्यावरील रांका ज्वेलर्सजवळ व वैभव टॉकीजजवळ खोदाईची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. येथे कामे करण्यासाठी परवानगी देताना संबंधित कनिष्ठ अभियंता, काम करणारा ठेकेदार यांचे जबाब घेऊन पालिकेच्या जबाबदारीवर ही परवानगी दिली जाणार आहे.