शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे वास्तव्यास असलेल्या आणि सध्या यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी स्वतःच्या श्रद्धांजलीची आणि मुलीला वाढदिवसाच्या पहिल्या व शेवटच्या शुभेच्छा अशी पोस्ट करत तसेच यवत पोलिस निरीक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याबाबत सुसाईड नोट टाकून बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात पोलीस नाईक निखिल रणदिवे बेपत्ता असल्याबाबत त्यांच्या भावाने तक्रार दाखल केली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती व बेपत्ता पोलिस नाईक निखिल रणदिवे यांच्या भावाने दिलेली तक्रार व सुसाईड नोटनुसार, पोलिस नाईक निखिल रणदिवे सध्या यवत पोलिस ठाण्यात कार्यरत असून, त्यांची काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे बदली झाली होती. त्यांनी त्यांचे कुटुंब शिक्रापूर येथे स्थायिक केले आहे.
मात्र, यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्यांना कार्यमुक्त न करता जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे सुरू केले. निखिल रणदिवे यांची मुलगी आजारी असताना आणि मुलीचा पहिलाच वाढदिवस असतानादेखील पोलीस निरीक्षक देशमुख यांनी त्यांना सुट्टी मंजूर केली नाही.
त्यामुळे पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी स्वतःच्या मोबाईलवर स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली, असे टाकून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याबाबत स्वाक्षराने लिहिलेली सुसाईट नोड पोस्ट केली. त्यांनतर पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे (वय ३३, सध्या रा. ज्ञानमंजुळा सोसायटी शिक्रापूर, ता. शिरुर, मूळ रा. बाभूळसर बुद्रुक, ता. शिरूर) हे बेपत्ता झाले. याबाबत अक्षय कैलास रणदिवे (वय ३०, सध्या रा. जेजेनगर, वाघोली, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे तपास करीत आहेत.