

पुणेः 'स्पा' सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने पाच पीडित तरुणींची सुटका केली. तर, याप्रकरणी मॅनेजर आणि स्पा' मालक महिलेवर गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली आहे. चंदननगरमधील ए वन स्पा येथे ही कारवाई करण्यात आली.
मॅनेजर सुवर्णा संदिप क्षिरसागर (३८) आणि मालक अश्विनी परेश कोळेकर (३६) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. याबाबत महिला पोलीस कर्मचारी यांनी फिर्याद दिली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान चंदननगर परिसरातील खराडी बायपास रोडवरील संभाजीनगर येथे ए वन स्पा येथे स्पा' च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.
पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून पाच पीडित तरुणींची सुटका केली. तर, स्पा मॅनेजर आणि मालकिणीसह दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणींना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, अंमलदार तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, वैशाली इंगळे, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.