मनोरमा खेडकर अटकेत  पुढारी
पुणे

Pooja Khedkar Case| अशी झाली मनोरमा खेडकरची इंदुबाई ढाकणे! जाणून घ्या सविस्तर

मनोरमा खेडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात; पती दिलीप खेडकर अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा मनोरमा खेडकर तीन दिवस रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणवाडी येथील एका छोट्याशा होम स्टेसारख्या हॉटेलमध्ये लपून बसली होती. पावसामुळे रायगड पर्यटनास बंदी आहे. यामुळे येथे सध्या कोणीही पर्यटक येत नाहीत.

मनोरमा हिने हॉटेल बुक करताना इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे आणि कॅब चालकाला भाऊ दाखवत दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे या नावाने रूम बुक केली होती. हॉटेल मालकाला पालीला दर्शनाला आल्याचे सांगितले होते. त्या आज रायगड किल्ल्यावर जाण्याच्या तयारीत होत्या.

एरवी पंचतारांकित सुविधा आणि आलिशान कारमध्ये फिरण्याची सवय असलेल्या मनोरमा रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका घरगुती हॉटेलमध्ये राहताना मिळून आली. एवढेच नाही, तर त्यांनी फरार कालावधीत घरातील आलिशान कार बाजूला ठेवून एक कॅब बुक केली होती. या कॅबमधूनच मागील तीन दिवस प्रवास करत होती.

हॉटेलमध्ये राहताना बनावट आधारकार्ड सादर केले होते. तसेच कॅब चालकाला स्वतःचा मुलगा दाखवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांची पथके खेडकर दाम्पत्याच्या शोधात होते.

मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी आपला मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्यांना शोधण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यांचे मॉडेल कॉलनीतील दुसरे घर आणि पाथर्डी येथील घरीही पोलिसांची पथके गेली होती. तसेच लोणावळा येथील फार्म हाऊसवरही पथक धडकले होते. त्या एखाद्या रिसॉर्टमध्ये किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत असतील असे पोलिसांना वाटत होते.

यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील काही हॉटेलही पालथी घालण्यात आली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान तांत्रिक तपास आणि बातमीदाराकडून माहिती मिळाली की, महाड येथील रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणवाडी भागात पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसली आहे.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने रात्रीच तेथे धाव घेऊन तिला सकाळी ताब्यात घेतले. मनोरमाचे पती दिलीप खेडकर हे मात्र अद्याप फरार आहेत. ते त्यांच्या सोबतच असतील असे पोलिसांना वाटत होते.

दोन बाऊन्सर, दोन महिलांविरुद्ध गुन्हा शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी दोन बाऊन्सर, दोन महिलांविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस मनोरमाच्या बाणेर येथील बंगल्यामध्ये पोहोचले होते. पण, मनोरमाने पोलिसांना बंगल्यामध्ये प्रवेश करू दिला नव्हता. त्यानंतर ती फरार झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT