विशाळगडप्रकरणी जिल्ह्यात पोलिसांचे संचलन

शांतता, सलोखा राखण्याचे पोलिस अधीक्षकांचे आवाहन
Police March In Sangli
सांगली : शहरातील खणभाग परिसरातून पोलिसांनी संचलन केले. Pudhari Photo

विशाळगडावरील वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्ह्यात पोलिस दलाच्यावतीने संचलन करण्यात आले. शहरात कर्मवीर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत रुट मार्च काढण्यात आला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सलोखा राखावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.

विशाळगड प्रकरणानंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर सायबर शाखेकडून लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ केली आहे. समाजात शांतता राखली जावी, यासाठी पोलिसांच्या वतीने गुरुवारी जिल्ह्यात संचलन करण्यात आले. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचलन झाले.सांगलीत कर्मवीर चौकातून रुट मार्चला सुरुवात झाली. पंचमुखी मारुती रोड, रिसाला रोड, बसस्थानक मार्गे मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात येऊन रुट मार्चची सांगता झाली.

या संचलनात पोलिस दलातील कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, जलद कृती दलाची पथके सहभागी झाली होती. सांगली ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने बिसूर (ता. मिरज) येथेही संचलन झाले. जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक सलोखा कायम राखावा, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news