Police Constable Suicide
पुणे: पोलिस मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या एका पोलिस कर्मचार्याने राहत्या घरी टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वरूप जाधव (वय 28) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
जाधव हे 2023 मध्ये पुणे शहर पोलिस दलात भरती झाले होते. सोमवारी (दि. 7) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील पोलिस वसाहतीत हा प्रकार समोर आला. (Latest Pune News)
याप्रकरणी खडक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, जाधव यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र समजू शकलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी जाधव हे मुळचे कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे राहणारे आहेत. कोल्हापूरला त्यांचे आई-वडील राहतात.
सध्या ते स्वारगेट पोलिस वसाहतीत बिल्डिंग नंबर 6 मधील रूम नंबर 384 मध्ये दोघा मित्रांसोबत राहत होते. तेथील परिसरात राहणार्या एका पोलिस कर्मचार्याला रूम क्रमांक 384 मधून काही तरी जळाल्यासारखा वास आला. त्यामुळे त्यांनी काय झाले हे पाहण्यासाठी त्या खोलीकडे गेले. बराचवेळ कोणी दरवाजा उघडला नाही.
त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता जाधव यांनी खिडकीला टॉवेलच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबात पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. त्यानुसार खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घरात कोणतीही सुसाइड नोट मिळून आली नाही. त्यांनी आत्महत्येविषयी मोबाईलमध्ये काही लिहून ठेवले आहे का? याची माहिती मोबाईल अनलॉक करून घेण्यात येत असल्याचे खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.