सासवड: पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी शासनाने शनिवारी (दि. 3) ड्रोन सर्व्हेचा पुन्हा प्रयत्न केला. त्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता, तरीही सात गावांतील नागरिकांनी सर्व्हेला जिवाची बाजी लावत विरोध केला.
पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करत लाठीमारही केला. दरम्यान, सर्व्हेच्या भीतीने कुंभारवळण गावातील एका 87 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला, असा दावा आंदोलकांकडून करण्यात आला. (Latest Pune News)
पुरंदर तालुक्यातील एखतपूर या गावात ड्रोन सर्व्हे शनिवारी करण्यात येत होता. या वेळी ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’, ‘जय जवान जय किसान’, ‘या सरकारचं करायचं काय ? खाली डोकं वर पाय’,
‘रद्द करा, रद्द करा विमानतळ रद्द करा’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी शेतकर्यांनीही बैलगाडी व विजेचे खांब रस्त्यावर टाकले होते. यामुळे दुपारी एकच्या दरम्यान मोठा पोलिस फौजफाटा खळदमार्गे एखतपूरमध्ये दाखल झाला.
दोन गुन्हे नोंद
एखतपूर गावात शुक्रवारी ड्रोन सर्वेक्षण सुरू असताना अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असतानाही गावकर्यांनी सर्वेक्षणाला पुन्हा विरोध दर्शविला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या कृत्याप्रकरणी देखील प्रशासनाकडून आणखी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंदोलक-पोलिसांत राडा
आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. आंदोलक शेतकर्यांकडून पोलिसांवर दगडफेक झाली. या झटापटीत पोलिस अंमलदार जखमी झाले. पोलिसांच्या लाठीमारात शेतकरी जखमी झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या अफवेने काही शेतकरी पोलिस गाडीला आडवे झोपले. पोलिसांवर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी लाठीमार केला असे प्रशासनाने सांगितले.
पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मागील चार महिन्यांपासून भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, वनपुरी, कुंभारवळण या गावांमध्ये हे विमानतळ होणार आहे. विमानतळासाठी जवळपास सात हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भागातून अनेक कुटुंबे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या भागातील जनतेकडून विमानतळाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
सर्व्हे करण्यासाठी आज महसूल प्रशासन, पोलिस खाते एखतपूर गावात पोहचले होते. महिलेचा मृत्यू हा पोलिस मारहाणीत झालेला नाही. 87 वर्षांच्या महिला या अत्यवस्थ होत्या. त्यांचा घरीच मृत्यू झाला. परंतु, महिलेच्या मृत्यूमुळे लोक भावनिक झाले आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला. यात पाच पोलिस अधिकारी आणि 20 पोलिस अंमलदार जखमी झाले. पोलिसांच्या दोन गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केली. याप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.- पंकज देशमुख, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक
नियमानुसार शासनाकडून 32 (2) ची नोटीस 7 गावांमधील गावकर्यांना दिली होती. शुक्रवारी संबंधित गावांतील नागरिकांनी ड्रोन सर्वेक्षणासाठी विरोधाची भूमिका दर्शविली होती. मात्र, शनिवारी सर्वेक्षणासाठी अधिकारी आणि कर्मचारी आल्यानंतर पोलिसांच्या अंगावर बैलगाडी सोडली आणि त्यांच्यावर दगडफेक केली. यात काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. मात्र, पोलिसांनी ही परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. शनिवारी हे सर्वेक्षण थांबविण्यात आले आहे. पुढील बैठकीनंतर ड्रोन सर्वेक्षण कधी करायचे? हे ठरविण्यात येईल.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी