पुणे

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत पोलिसांची लाचखोरी वाढली

अमृता चौगुले

राजेंद्र गलांडे

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील बारामती शहर, तालुका आणि वडगाव निंबाळकर या तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये अधिकारी-कर्मचार्‍यांची लाचखोरी वाढली आहे. गत आठवड्यात शहर पोलिस ठाण्यातील हवालदारासह होमगार्डवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दै. 'पुढारी'ने चिरिमिरी घेणे थांबणार आहे की नाही? हे वृत्तही प्रसिद्ध केले होते, परंतु त्यानंतरही लाचखोरी थांबायचे नाव घेत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लाचखोरीमुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळत असून, ती पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांपुढे निर्माण झाले आहे.
पोलिस दलात बळावलेली लाचखोरी सध्या बारामती शहर व तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. जानेवारीपासून या तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत आजवर सहा ते सात जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून कारवाई झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच तालुक्यात हे प्रकार वाढले आहेत.

विशेष म्हणजे या वर्षात पोलिस दल वगळता अन्य कोणत्याही विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यावर ही कारवाई झालेली नाही. फक्त पोलिस दलातील अधिकारी-कर्मचार्‍यांवरच कारवाया होत आहेत, हे विशेष. कोणताही व्यक्ती अति त्रास झाल्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे दार ठोठावत नाही. सामान्यांना हा त्रास का होतोय, याकडेही वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. लाच प्रकरणात सातत्याने पोलिस दल अडकत आहे.

त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचकही कमी होत चालला आहे. कारण, बहुतांशी कारवायांमध्ये दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या हेतूनेच पैसे घेतले गेले आहेत. अगदी आठशे रुपयांपासून ते लाखापर्यंतच्या लाचेची मागणी येथे झाल्याचे दाखल गुन्ह्यावरून समोर आले आहे. बारामती उपविभागात अनेक कर्मचारी गेली अनेक वर्षे ठाण मांडून आहेत. उपविभागाबाहेर बदली झाली तरी काही दिवसातच ते पुन्हा या विभागात बदलून येतात.

त्यांचे येथील राजकारण्यांसह अनेकांशी लागेबांधे निर्माण होतात. त्यामुळे लाचखोरी वाढते आहे. दूरच्या पोलिस ठाण्यात बदल्या झाल्याशिवाय या प्रकारांना आळा बसणे अशक्य आहे. 'कलेक्शन'मध्ये आग्रही असणार्‍या काहींची यादी वरिष्ठांकडे सादर केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पोलिस ठाण्यात कोणत्याही कामासाठी सामान्य व्यक्ती गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी सौजन्याची वागणूक देणे अपेक्षित आहे. संबंधिताचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे, परंतु हे होताना दिसत नाही. त्याऐवजी उलटसुलट प्रश्नानेच हैराण केले जाते. त्यामुळे तक्रार नकोच, या मानसिकतेत सामान्य येतात.
– अ‍ॅड. नवनाथ भोसले, माजी उपाध्यक्ष, बारामती बार असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT