Maharashtra Police
तरच गुन्हेगार, समाजकंटक मर्यादेत राहतील File Photo
पुणे

Pune Crime|...तरच गुन्हेगार, समाजकंटक मर्यादेत राहतील

पुढारी वृत्तसेवा

खाकीचा धाक आणि दरारा कायम राहिला तरच गुन्हेगार, समाजकंटक त्यांच्या मर्यादेत राहतील. सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षितता आणि मोकळेपणाची भावना निर्माण होईल. एरवी वाहतूक पोलिसांसोबत वाद घालून त्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटना घडतात. मात्र, अलीकडे थेट पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत अनेकांची मजल जाऊ लागली आहे.

एवढेच नव्हे, तर कर्तव्य बजावण्यास गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून नोकरी घालविण्याची धमकी देण्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी शासकीय कामात अडथळे आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जातात. मात्र, अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचे वास्तव आहे.

पोलिसांनाच मारहाण होऊ लागली, अंगावर गाड्या घातल्या जाऊ लागल्या, तर 'खाकी'चा दरारा राहील काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कारवाईचा अंकुश हवाच. मात्र, सर्व पोलिसांना एकाच नजरेतून पाहणे चुकीचे आहे. पोलिस सामाजिक स्वास्थाचा कणा आहेत. त्यांच्या मानसिक स्वास्थाची काळजी घ्यावीच लागेल.

पोलिस हा समाजातील 'फ्रन्ट लाइन वर्कर' आहे. अनेकदा कक्षात नसलेली कामेदेखील पोलिसांना करावी लागतात. एखाद्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर थेट वरिष्ठांच्या नावाची धमकी दिली जाते. शहरातील तब्बल ४५ अधिकाऱ्यांनी 'पोलिस ठाण्याचा काटेरी मुकूट डोक्यावर नको रे बाबा' म्हणत साईड बॅचची मागणी केली आहे. त्यामध्ये पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

ढीगभर गुन्हे अंगावर असलेलेदेखील पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार करतात. कोणी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून पाहतो. तर, कधी रस्त्यावर थेट पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन त्यांचा बळी घेतला जातो. रस्त्यावर उभा राहणारा अंमलदार हा पोलिस यंत्रणेचा कणा आहे. चुकीच्या कामाचा ठपका ठेवत होत असलेले निलंबन, अशा परिस्थितीत पोलिसांचे मनोबल टिकवण्याचे मोठे आव्हान शहर पोलिस दलापुढे उभे आहे. पाहताचक्षणी गुन्हेगारांना घाम फोडणारी वर्दी आज केविलवाणी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 'पोलिसदेखील माणूस आहे.' हे वाक्य केवळ म्हणण्यापुरते शिल्लक राहिले आहे. पोलिसांचा खरोखरीच माणूस म्हणून विचार होणार आहे का? अशा भावाना सर्वसामान्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या आहेत. बोपोडीतत मार्शल ड्युटीवरील दोन पोलिसांना भरधाव मोटारीने धडक दिली.

या अपघातात पोलिस हवालदार समाधान कोळी या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर, दुसरे पोलिस शिपाई संजोग शिंदे हे जखमी झाले. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रसंग. कोळी यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या पत्नीला सांगण्याचे धाडस पोलिसांनाही न व्हावे अशी ही वेळ. कोळी यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा.

पोलिस ठाण्यातील कोळी यांच्या सहकाऱ्यांनादेखील भावना अनावर झाल्या गेल्या आठवड्यात ५ जुलै रोजी फरासखाना वाहतूक विभागातील सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलिस हवालदार समीर प्रकाश सावंत या दोघांना एका दारूड्याने पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

गर्दनि गजबजलेल्या बुधवार पेठेतील फरासखाना वाहतूक विभागाच्या बाहेर ही घटना घडली. दारूड्याला थांबवून त्याच्यावर कारवाई केली म्हणून त्याने हे कृत्य केले. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याने शहरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिथे पोलिसच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल, अशी टीकादेखील समाजमाध्यमातून होऊ लागली होती.

अशातच खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा बळी घेणारा अपघात घडल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. शहराची झपाट्याने वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत असलेले अपुरे पोलिसांचे मनुष्यबळ हा मोठा प्रश्न आहे. त्यातच व्हीआयपी व्यक्तींचे दौरे, राजकीय सभा कार्यक्रम या सर्वांचा पोलिसांवर मोठा ताण पडतोय. मोठा पोलिस ठाण्याचा गाडा हाकताना तर अक्षरशः प्रभारी अधिकाऱ्यांची दमछाक होते. अशात हद्दीतील कायदा सुव्यवस्था सांभाळून, नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा पोलिसांना करायचा असतो.

SCROLL FOR NEXT