पुणे: पोलिस उपायुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एकाच दिवशी दोन जुगार अड्ड्यावर कारवाई केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या खराडी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री पोकर जुगारावर छापा टाकून कारवाई केली.
याप्रकरणी, जुगार चालकासह 26 जणांना खराडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध पोलिस हवालदार महेश नाणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
सातव वस्ती मार्वल सिट्रीन या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद सदनिकेत बेकायदा पोकर हा जुगार चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पथकाने सोसायटीतील सदनिकेत छापा टाकला.
त्या वेळी टेबलावर आरोपी जुगार खेळताना आढळून आले. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, रोकड आणि मोबाईल असा 77 हजार 100 रुपयांचे साहित्य जप्त करण्यातआले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे निरीक्षक विश्वजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, गणेश घुले यांच्या पथकाने केली.
वरातीमागून घोडे?
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडक निर्देशानंतरदेखील खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे सुरू असल्याचे समोर आले होते. एकाच दिवशी दोन जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती.
एक कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तर दुसरी कारवाई पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या पथकाने केली होती. त्यामुळे खराडी पोलिसांची वरिष्ठांनी चांगलीच कानउघाडणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या खराडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे खराडी पोलिसांचे वरातीमागून घोडे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.