सुवर्णा चव्हाण
पुणे: कोणी ढोल-ताशा पथकात वादन करीत आहेत, तर कोणी मंडळांच्या कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत... कोणी गणेशोत्सवात श्री गणरायाची विविध छायाचित्रे टिपत आहेत, तर कोणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत आहेत... गणेशोत्सवात यंदाही महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून, उत्सवातील कार्यक्रमांच्या नियोजनापासून ते श्री गणरायाच्या आरतीच्या नियोजनापर्यंतची जबाबदारी कार्यकर्त्या उत्साहाने सांभाळत आहेत.
पुरुष कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्याही उत्सवातील प्रत्येक उपक्रमांत मोठ्या आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत असून, यंदाही गणेशोत्सवात महिला कार्यकर्त्यांचा डंका दिसून येत आहे. कोणी अनुभवी आहेत, तर कोणी नवख्या... मात्र, प्रत्येकीचा उत्साह दांडगा असून, ‘हम किसीसे कम नहीं’ हे त्यांनी दाखवून दिले आहे. (Latest Pune News)
कोणी मंडळाच्या उपाध्यक्षा आहेत, तर कोणी मंडळाच्या सदस्या... पद कोणतेही असो, प्रत्येक कार्यक्रमाच्या नियोजनात त्या उत्साहाने सहभागी होत आहेत. 25 वर्षांच्या तरुणी असो वा 65 वर्षांच्या ज्येष्ठ महिला... प्रत्येक जण उत्सवाच्या रंगात रंगून गेली आहे. गृहिणी आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून उत्सवाचे नियोजन करीत आहेत.
मंडळांच्या श्री गणरायाच्या रोजच्या आरतीपासून ते महिलांसाठीच्या विविध उपक्रमांपर्यंत देखाव्यांसाठी लागणार्या साहित्यांच्या नियोजनापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंतच्या व्यवस्थापनाला त्या वेळ देत आहेत. अथर्वशीर्षपठण, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, महिलांसाठीच्या स्पर्धा, हळदी-कुंकू कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी महिला कार्यकर्त्यांकडे आहे.
याविषयी मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या सचिव दीपा तावरे म्हणाल्या, मंडळाच्या सचिव या पदावर काम करताना खूप आनंद होतो. या वर्षी उत्सवात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, श्री कसबा गणपती पुरस्कार, उत्सवात महिला दिनाचा कार्यक्रम, श्री गणरायाची रोजची आरती, मिरवणुकीचे नियोजन मी करीत आहे.
मिरवणुकीच्या नियोजनापासून ते उत्सवातील दहा दिवसांच्या कार्यक्रमांची जबाबदारी आम्ही महिला कार्यकर्त्या एकत्र येऊन सांभाळतो. पुरुष कार्यकर्त्यांच्या जोडीला आमच्या मंडळातील महिला कार्यकर्त्याही उत्स्फूर्तपणे प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात.
एरंडवणे येथील गणेशनगर येथे असलेल्या देशप्रेमी मित्रमंडळाच्या दीक्षा आणि मानसी बलकवडे यांचाही कार्यक्रमांच्या नियोजनात सहभाग आहे. दीक्षा आणि मानसी म्हणाल्या की, व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून आम्ही दरवर्षी गणेशोत्सवात सहभागी होतो. यंदाही महिलांसाठी विविध कार्यक्रम ते विविध स्पर्धांपर्यंतचे आयोजन आम्ही केले आहे. आमच्या मंडळांत महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे.
महिलांच्या कला वाद्य पथकाचाही उत्सवात डंका...
महिला-युवतींचे पथक अशी ओळख असलेले ढोल-ताशा पथक म्हणजे उरुळी कांचन येथील कला वाद्य पथक. उत्सवात पथकातील महिला वादकांच्या वादनाचा निनाद सगळीकडे दुमदुमतोय. याविषयी पथकाच्या ज्योती झुरंगे म्हणाल्या, आम्ही महिला-युवतींनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी पथकाची सुरुवात केली.
फक्त महिला-युवतींसाठी एखादे पथक असावे, यासाठी आम्ही पैसे जमा करून पथकाची स्थापना केली. महिला-युवतींचे पथक असल्याने खूप चांगला प्रतिसाद मिळतो. यंदाही पथकातील महिला वादक ठिकठिकाणी वादन करीत आहेत आणि आमच्या वादनाला दाद मिळत आहे. पथकात 350 महिला-युवतींचा सहभाग आहे. ओंकार धुमाळ हे वादन प्रशिक्षक आहेत. पथकात सविता कांचन, शिल्पा पाटील, वनिता चांदगुडे, कल्पना वाडेकर यांचाही सहभाग आहे.