पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकास (पीएमआरडीए) करीत असलेल्या प्रकल्पासाठी तीनशे कोटींची आवश्यकता आहे. पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील प्रकल्प, ज्यामध्ये रस्ते, पंतप्रधान आवास योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी तीनशे कोटींची मागणी पीएमआरडीएने शासनाकडे केली आहे.
केंद्र सरकारकडून भांडवली विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या बिनव्याजी विशेष साहाय्य योजनेतून तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्याबाबतीत महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकार यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत उड्डाणपुलासाठी येणार्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के खर्च महापालिकेने उचलावा, असे ठरले होते. मात्र, महापालिकेने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे, प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांचे नियोजन पीएमआरडीएने हाती घेतले आहेत. अशा सर्व प्रकल्पांसाठी पीएमआरडीएला निधीची आवश्यकता आहे.
विद्यापीठ चौकात उड्डाणपूल असूनदेखील वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. मेट्रोचे नियोजन झाल्यानंतर लॉकडाऊन काळात येथील पूल जमीनदोस्त करण्यात आला. परंतु त्यानंतर अनेक दिवस पूल उभारणीच्या काहीच हालचाली होत नसल्याने पुणेकरांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यानंतर बैठका, आराखडे मंजुरीच्या प्रक्रिया सुरू झाल्या. आता चौकात उभारण्यात येणार्या पुलासाठी वाढीव निधी मंजूर करत कामालादेखील सुरुवात झाली आहे. आगामी 50 वर्षांचा विचार करून हे दुमजली पूल बांधण्यात येणार आहेत. पाषाण, औंध, बाणेरकडून विद्यापीठ चौकात येणारी वाहनांची वाहतूक सुरळीत होऊन, वाहतूककोंडीपासून सुटका होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील दुमजली उड्डाणपूल, पंतप्रधान आवास योजना, विकास आराखड्यातील रस्ते अशा विविध प्रकल्पांसाठी या वर्षी पहिल्या टप्प्यात तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त