Pune bus women security
पुणे : पुणे शहर पोलिसांनी पीएमपीच्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेमुळे प्रवासात महिलांची सुरक्षितता वाढणार आहे. पीएमपीने महिला प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या होत्या. त्यानंतर ही बाब गांभीर्याने घेत पोलिस आयुक्तांकडून ही मोहीम सुरू करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या मोहिमेअंतर्गत पुणे शहर पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकात 4 पोलीस अधिकारी (2 पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक) आणि 22 पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. हे पथक पीएमपीच्या बसमधून प्रवास करणार आहे. यामुळे बसमधील आणि बस स्थानकांवरील गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही काळापासून पीएमपीच्या प्रवाशांना, विशेषतः महिलांना, अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यामध्ये प्रवाशांचे प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू आणि पाकिटांच्या चोर्या होत आहेत. अश्लील हावभाव किंवा शब्दांचा वापर करून महिला प्रवाशांना त्रास दिला जात आहे. असामाजिक घटकांकडून बसस्थानकांमध्ये अश्लील मजकूर लिहिणे किंवा चित्रे काढण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे महिला प्रवासी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी पीएमपी प्राप्त झाल्या आहेत.
पुणे पोलिसांचे हे विशेष पथक गर्दीच्या मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या मार्गांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत नियमित गस्त घालणार आहे. याशिवाय, हे पथक बसमधून प्रवास करून प्रत्यक्ष कारवाई करेल. यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित वाटेल आणि बस प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा आहे.