नव्या 1 हजार बसमुळे प्रवास होणार सुकर; पीएमपीएमएल करणार बसमार्गांची फेरआखणी  PMPML
पुणे

PMPML Buses: नव्या 1 हजार बसमुळे प्रवास होणार सुकर; पीएमपीएमएल करणार बसमार्गांची फेरआखणी

डेपोचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढविण्याची योजना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमार्गांची फेरआखणी करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संचलनातील तोटा कमी करण्यासाठी ही पावले उचलली जाणार आहेत. त्याचबरोबर एक हजार नवीन सीएनजी बस खरेदीचा अन्‌‍ उत्पन्नवाढीसाठी बस डेपोच्या 10 जागांचा व्यावसायिक वापर करण्याचाही निर्णय झाला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळाची बैठक मंगळवारी (दि.23) पार पडली. या वेळी पीएमपीएमएलचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, आयुक्त नवल किशोर राम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पीएमपीएमएलच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (Latest Pune News)

पीएमपीएमएलच्या बसेस सध्या पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत धावत आहेत. यापैकी अनेक मार्ग तोट्यात असूनही सुरू ठेवले जातात. आता या मार्गांची संपूर्ण पाहणी करून फेररचना करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. यासाठी एक तज्ज्ञ सल्लागार नेमला जाणार असून, तो कोणते मार्ग तोट्यात आहेत, कोणते आवश्यक आहेत, याबाबत अहवाल तयार करणार आहे.

डेपोचा होणार व्यावसायिक वापर

पीएमपीएमएलच्या उत्पन्नवाढीसाठी बस डेपोच्या जागा व इतर मिळकतींचा व्यावसायिक वापर करण्यावर चर्चा झाली. यासाठी देखील सल्लागार नेमला जाणार आहे. पीएमपीएमएलच्या 10 जागांवर हा व्यावसायिक प्रकल्प राबणे शक्य असून, प्रारंभी एका बस डेपोत प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

सीएनजीवरील बसखरेदीवर बैठकीत शिक्कामोर्तब

या बैठकीत नवीन बस खरेदीबाबतही निर्णय घेण्यात आला. पीएमपीएमएल एक हजार सीएनजी बस खरेदी करणार आहे. बस पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांपैकी बेकडाऊनचे प्रमाण कमी असलेल्या कंपनीच्या बसेस घेण्यावर या वेळी निर्णय घेण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत इलेक्ट्रिक बसेस आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे नवीन बसेस सीएनजीवर चालणाऱ्या असतील, यावरही निर्णय घेण्यात आला.

संचलनातील तूट कमी करण्यासाठी बसमार्गांची फेरआखणी आवश्यक आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच उत्पन्नवाढीसाठी डेपोचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT