पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. कंपन्यांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन ऑफ-टाइममध्ये (गर्दी नसलेल्या वेळेत) तीन शिफ्टनुसार विशेष बस चालवण्याचे नियोजन पीएमपीकडून करण्यात येत आहे. या नियोजनामुळे कामगारांना हक्काची आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून, पीएमपीच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांचे कामकाज प्रामुख्याने तीन शिफ्टमध्ये चालते. यामध्ये सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० या वेळा महत्त्वाच्या असतात. नेमक्या याच वेळांमध्ये शहरातील इतर मार्गांवर पीएमपी बसला फारशी गर्दी (पिकअवर) नसते.
त्यामुळे अनेक बस आगारांमध्ये किंवा थांब्यांवर उभ्या असतात. हीच बाब लक्षात घेऊन, ज्या वेळी पीएमपीच्या गाड्यांना प्रवासी नसतात, त्याच वेळेत औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी विशेष बस सोडण्याचा आराखडा तयार केला जात आहे.
मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी पीएमपीची चर्चा सुरू
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीसह शहराच्या इतर भागांतील मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी पीएमपीची चर्चा सुरू आहे. कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे निवासस्थान असलेले मार्ग यांचा अभ्यास करून या विशेष गाड्यांचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा या साधारणपणे सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० अशा तीन शिफ्टमध्ये असतात. नेमक्या याच वेळेत गर्दी नसल्याने शहरातील नियमित मार्गांवर पीएमपीच्या बसेस उभ्या असतात. या बसचा योग्य वापर करून औद्योगिक कामगारांची ने-आण करण्यासाठी विशेष सेवा सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कामगारांना किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासाची सोय तर होईलच, शिवाय पीएमपीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल.महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल