पुणे: पीएमपीच्या ताफ्यात येत्या पंधरा दिवसांत नव्या पर्यावरणपूरक पन्नास ई-बस दाखल होणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात प्रत्येकी २५ याप्रमाणे या बस पुण्यात आणल्या जाणार असून, यामुळे प्रवासी सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
हैदराबादमध्ये या बसेसची बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकतीच पीएमपीएमएलच्या एका उच्चस्तरीय पथकाने हैदराबादला जाऊन या तयार झालेल्या बसची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी केलेल्या तपासणीदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
तांत्रिक पडताळणी आणि पाहणी यशस्वी झाल्यानंतर, या बस पुण्यात आणण्या साठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नियोजनानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात २५ बसेस आणि दुसऱ्या आठवड्यात उर्वरित २५ बसेस पुण्यात दाखल होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील. पीएमपीने यापूर्वी एकूण ६५० ई- बसची ऑर्डर दिली होती.
त्यापैकी ५३५ बस आधीच ताफ्यात दाखल होऊन वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. उर्वरित ११५ बसपैकीच या ५० बस आता येत असून, राहिलेल्या बसही टप्प्या-टप्प्याने लवकरच दाखल होणार असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.
६५० ई-बसच्या खरेदीमधील ५३५ बस आधीच प्रवाशांच्या सेवेत आहेत. उर्वरित ११५ बसपैकी ५० बसच्या बांधणीची पाहणी पूर्ण झाली असून, येत्या १५ दिवसांत त्या पुण्यात दाखल होतील. या नव्या बसमुळे मार्गांवरील बसची संख्या वाढेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. उर्वरित 65 बस देखील यापाठोपाठ लवकरच ताफ्यात समाविष्ट केल्या जातील.महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल