PMPML Pudhari
पुणे

PMPML Chairman: 19 वर्षांत 23 अध्यक्ष; पीएमपीमध्ये अधिकाऱ्यांची ‘संगीत खुर्ची’

वारंवार बदलीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या विकासाला खीळ; नव्या अध्यक्ष महेश आव्हाड यांच्याकडून पुणेकरांना अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पीएमपीमध्ये कार्यकाळ संपायच्या आतच सातत्याने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्या होत आहेत. परिणामी, पीएमपीच्या विकासाला मोठी खीळ बसली असून, यामुळे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीचा विकास कसा होणार, असा सवाल तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे पीएमपीच्या 19 वर्षांच्या काळात 23 अध्यक्ष झाले आहेत. पदभार घेतल्यानंतर अवघ्या आठ ते नऊ महिन्यांतच पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांची बदली झाली, असेच जर सातत्याने होत राहिले तर पीएमपीचा विकास कसा होणार, असे मत पीएमपी तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 2017 मध्ये पदभार घेतला, त्यांचीही बदली वर्षाच्या आतच झाली. त्यानंतर नयना गुंडे यांनी पदभार घेतला. त्यांनी तब्बल अडीच वर्षे पीएमपीमध्ये काम केले. यानंतर डॉ. राजेंद्र जगताप यांनी पदभार घेतला, त्यांचीही बदली एका वर्षाच्या आत झाली. त्यांच्याच काळात नव्या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर कुणाल खेमनार यांच्याकडे पीएमपीचा अतिरिक्त कार्यभार आला. तोही फक्त एक महिन्यांसाठी होता. यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली. त्यांचीही बदली अवघ्या काही महिन्यांतच झाली.

त्यांच्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचीही अवघ्या नऊ महिन्यांत अचानक कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाली. त्यानंतर सचिंद्र प्रताप सिंह नवे अध्यक्ष झाले, चार महिन्यातच बदली झाली. पीएमपीएमएलची स्थापना झाल्यापासून अवघ्या 19 वर्षात 23 अध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. परिणामी, पीएमपीचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात नाराजीचे वातावरण आहे. सचिंद्र प्रताप सिंह यांच्यानंतर संजय कोलते यांनी पदभार स्वीकारला होता, त्यांचीही बदली एका वर्षाच्या आतच झाली. त्यानंतर दीपा मुधोळ-मुंडे यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतला. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अवघ्या एक वर्ष 4 दिवसांतच त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. आता पंकज देवरे यांचीही बदली अवघ्या आठ ते नऊ महिन्यांतच झाली आहे. आता महेश आव्हाड यांनी गुरुवारी (दि. 12) पदभार घेतला. आव्हाड हे पीमपीमध्ये किती दिवस काम पाहणार आणि पुणेकर प्रवासी हिताचे काय-काय निर्णय घेणार, याची पुणेकरांना आणि प्रवासी तज्ज्ञांना उत्सुकता लागली आहे.

सात वर्षात पीएमपीला आठ अध्यक्ष

1) नयना गुंडे - फेबुवारी 2018 ते जुलै 2020

2) डॉ. राजेंद्र जगताप - जुलै 2020 ते जून 2021

3) डॉ. कुणाल खेमणार - जून 2021 ते जुलै 2021

4) लक्ष्मीनारायण मिश्रा - जुलै 2021 ते ऑक्टोबर 2022

5) ओमप्रकाश बकोरिया - ऑक्टोबर 2022 ते 6 जुलै 2023

6) सचिंद्र प्रताप सिंह -6 जुलै 2023 ते 23 ऑक्टोंबर 2023

7) डॉ. संजय कोलते - ऑक्टोबर 2023 ते जुलै 2024

8) दीपा मुधोळ-मुंडे - 13 जुलै 2024 ते 17 जुलै 2025

9) पंकज देवरे - 19 जुलै 2025 ते 11 मार्च 2026

पीएमपी ही आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम नाही. तिला आर्थिक स्वायत्तता नाही. पीएमपीतील अधिकाऱ्याला दोन्ही मनपांना संचालन तूट मागावी लागते. त्यामुळे बरेचसे अधिकारी स्वत:च बदली करून घेतात. कधी-कधी राजकीय दबाव, ठेकेदारांची दादागिरी असते. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली होणे, हे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला खीळ घालणारे आहे. यामुळे पीएमपीचा विकास खुंटत आहे. मात्र, असो नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा. नवीन अध्यक्षांनी प्रवासी हिताचे निर्णय घेतल्यास आमचा कायमच त्यांना पाठिंबा असेल.
संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT