प्रसाद जगताप
पुणे: पीएमपीच्या ताफ्यात यंदाच्या डिसेंबरअखेर तब्बल ५०० नवीन सीएनजी बस दाखल करण्यात येणार आहेत. यातील २५० बस दिवाळीपर्यंत म्हणजेच दोन महिन्यांत दाखल होणार आहेत. याकरिता पीएमपी प्रशासनाने पाच ठेकेदारांची नियुक्ती केली असून, या बस टाटा आणि अशोक लेलँड कंपनीच्या असतील. या नव्या बसमुळे पुणेकर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) आणि पीएमपीच्या संयुक्त पथकाने बसबांधणीच्या कामाची प्रत्येक टप्प्यावर सखोल पाहणी केली असून, या सर्व तपासण्यांनंतरच बस ताफ्यात समाविष्ट करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
नुकतीच रायगड जिल्ह्यातील अशोक लेलँड आणि लखनऊ येथील टाटाच्या बसबांधणी कारखान्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट दिली. तेथे प्रत्यक्ष पाहणी करून बसची रचना, सुरक्षा मानके आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांची खात्री करण्यात आली.
टप्प्याटप्प्याने होणार पुरवठा
एकूण नियोजित ५०० बसपैकी ५० टक्के म्हणजेच २५० सीएनजी बस पुढील दोन महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील.
उर्वरित २५० बस वर्षअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे ५०० बसचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
पीएमपीच्या ताफ्यात वर्षअखेरपर्यंत ५०० सीएनजी बस आणण्याचे नियोजन आम्ही केले आहे. रायगड जिल्ह्यातील अशोक लेलँड आणि लखनऊ येथील टाटाच्या बसबांधणी कारखान्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून, त्या बस पुण्यात आणण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. सीआयआरटी आणि पीएमपीच्या पथकाने प्रत्येक टप्प्यावर सखोल पाहणी केली आहे. येत्या दोन महिन्यांत २५० बस आणि वर्षअखेरीस पूर्ण ५०० बस ताफ्यात दाखल होतील. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल