PMPML Pudhari
पुणे

Pune Municipal Budget 2026-27: पीएमपीसाठी 2026-27 अर्थसंकल्पात भरीव बससेवा विकास तरतूद

650 ई-बसेस, 1 हजार नवीन सीएनजी बस आणि बीआरटी बस स्थानकांवर सुरक्षा उपाययोजना प्रस्तावित

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेने सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात पीएमपीसाठी भरीव तरतूद केली आहे. महामंडळाच्या संचालनातील तूट भरून काढण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी मिळून एकूण 592.22 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता सार्वजनिक बससेवेचा विस्तार करण्यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे.

मागील वर्षात पीएमपीच्या बस ताफ्याच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली आहे. भाडेतत्त्वावरील 350 ई-बसेसपैकी 235 ई-बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, उर्वरित बस लवकरच दाखल होणार आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात 535 ई-बस कार्यरत असून, उर्वरित 115 बस दाखल झाल्यानंतर हा आकडा 650 वर पोहोचणार आहे.

आगामी वर्षात बससेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन केले आहे. सन 2026-27 या वर्षात पीएमपीच्या ताफ्यात 1 हजार नवीन स्वमालकीच्या सीएनजी बस दाखल करणार आहेत. तसेच जीसीसी तत्त्वावर आणखी 599 सीएनजी बससेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. याशिवाय केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेअंतर्गत 1 हजार ई-बस जीसीसी तत्त्वावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सीईएसएल मार्फत निविदा प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधा वाढविण्यासाठीही विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका हद्दीतील सर्व बीआरटी बसस्थानकांवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक, बस स्थानकांची जेट मशीनच्या साहाय्याने स्वच्छता, तसेच 15 प्रमुख रस्त्यांवरील नॉन-बीआरटी बसथांब्यांजवळ बस-वे (यलो बॉक्स) तयार करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय सर्व बीआरटी स्थानके आणि भुयारी मार्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजनाही राबविण्यात येणार आहे.

पीएमपीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुतारवाडी-पाषाण आणि निगडी भक्ती-शक्ती डेपो येथे बीओटी तत्त्वावर डेपो व व्यापारी संकुल उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 49 आधिक 49 वर्षांचा लीज कालावधी ठेवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT