PMPML Pudhari
पुणे

PMP New Buses: नव्या पीएमपी गाड्यांसाठी हवी १०० एकर जागा

पीएमपीएमएलचा दोन्ही महापालिका, पीएमआरडीए अन्‌ जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या १५०० बसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी तब्बल १०० एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाकडे पीएमपी प्रशासनाने जागेची मागणी केली आहे.

पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या सेवेसाठी आपल्या ताफ्यात नव्या बसगाड्यांचा समावेश करत आहे. मात्र, सध्या पीएमपीकडीलच बस रात्रीच्या वेळी सुरक्षितपणे पार्क करण्यासाठी आणि त्यांच्या तांत्रिक देखभालीसाठी सध्याचे डेपो अपुरे पडत आहेत.

आगामी काळात येणाऱ्या

नव्या बसची संख्या लक्षात घेता, शहराच्या विविध भागांत आणि उपनगरांमध्ये नवीन डेपो व पार्किंग टर्मिनल उभारणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठीच पीएमपी प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून जागांची मागणी केली आहे. प्रशासनाकडून जागा मिळाल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास पीएमपीने व्यक्त केला आहे.

विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध सुरू

पीएमपी प्रशासनाला नव्या बसगाड्यांच्या पार्कींगसाठी जागांची आवश्यकता आहे. त्याचा शोध पीएमपीकडून सुरू झाला आहे. विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध प्रशासनाने घेतला असून, त्या पीएमपी प्रशासनाला मिळाव्यात, यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच तयार करून, संबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे. आता संबंधित प्रशासनाकडून पीएमपीला जागा देण्याबाबत कसा प्रतिसाद मिळतो, हे आता पाहावे लागणार आहे.

'पीएमपी'च्या ताफ्यात नव्या बस दाखल होत असताना त्यांच्या पार्किंगचे नियोजन करणे, हे आमच्यासमोरील मुख्य नियोजन आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि बसची योग्य देखभाल करण्यासाठी आम्हाला तातडीने १०० एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाने आम्हाला जागा उपलब्ध करून दिल्यास, डेपोचे जाळे विस्तारून आम्ही आणखी सक्षमपणे सेवा देऊ शकू...
- महेश आव्हाड, अध्यक्ष, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT