पुणे

पुणे : पीएमपीत जाणवतेय कर्मचार्‍यांची कमतरता

अमृता चौगुले

प्रसाद जगताप

पुणे : गेल्या दोन महिन्यांत पीएमपीकडील 200 कर्मचारी सेवानिवृत्त (रिटायर्ड) झाले. त्यामुळे या दोनशे कर्मचार्‍यांच्या जागी कोण काम करणार, असा सवाल प्रशासनापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे पीएमपीत आता कर्मचार्‍यांची कमतरता जाणवत आहे. पीएमपीच्या ताफ्यात अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, देखभाल-दुरुस्ती करणारे असे मिळून एकूण 9 हजार कर्मचारी आहेत. पूर्वी या कर्मचार्‍यांची संख्या 10 हजारांपेक्षा अधिक होती. मात्र, या कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

वर्षाला सुमारे साडेचारशे ते 500 कर्मचारी सेवानिवृत्तीसह अन्य कारणांमुळे कमी होत आहेत. गेल्या दोन महिन्यांतच 200 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यापैकी 141 कर्मचारी मे महिन्यात सेवानिवृत्त झाले तर 59 कर्मचारी जूनमध्ये सेवानिवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे त्यांच्या जागी काम कोण करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

कर्मचारी भरतीची गरज…

पीएमपीच्या ताफ्यात सध्या चालकांची गरज एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण, बहुतांश चालक हे ठेकेदारांकडीलच आहेत. मात्र,पीएमपीला सध्या वाहकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्यामुळे पीएमपीने त्यांच्याकडील काही चालकांना वाहक बनविले आहे. त्यांना प्रशिक्षण दिले आहे. तरीही वाहकांची संख्या कमीच आहे. तसेच, क्लार्कची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे पीएमपीत कर्मचारी भरतीची गरज आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT